पळसकटा-मोले येथे अपघातात दुचाकीचालक ठार, एक गंभीर

0
7

काल रविवारी 4 फेब्रुवारी रोजी ट्रक व दुचाकी यांच्यात पळसकटा – मोले येथे झालेल्या अपघातात शिवकुमार सिंग (23, मध्यप्रदेश) या तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात आशिष साहू (25, मध्यप्रदेश) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. आशिष साहू याला अधिक उपाचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रकचालकाने ट्रकसह पळ काढला.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जीए 05 ई 3252 ही दुचाकी घेऊन शिवकुमार हा तरूण मोले येथून फोंडा येथे जात होता. दुचाकीवर मागे आशिष बसला होता. संध्याकाळी 5 च्या सुमारास पळसकटा येथील जंक्शनजवळ अचानक विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची धडक या दुचाकीला बसली. यात दुचाकीचालक शिवकुमारचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला अशिष हा गंभीर जखमी झाला. आशिषला प्रथम 108 रुग्णवाहिकेने प्रथम पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला गोमेकॉत नेण्यात आले. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रकसह तेथून पळ काढला. पण जंक्शनजवळ असलेल्या लोकांनी ट्रक ओळखल्याचे समजताच चालकाने अंदाजे 200-300 मीटर अंतरावर ट्रक पार्क करून तेथून पळ काढला. शिवकुमार सिंग हा गेल्या 15 दिवसांपूर्वी गोव्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून फोंडा परिसरात जिओ टेलिकॉममध्ये नोकरी करीत होता. रविवारी कुळे येथील दूधसागर देवस्थानात कालोत्सव असल्याने दुपारी आपल्या मित्रासह दर्शन घेऊन माघारी परताना अपघात घडला. कुळे पोलिसांनी पंचनामा केला आहे.