पर्वरी महामार्गावर मेगाब्लॉक

0
122

तिसर्‍या मांडवी पुलाच्या कामासाठी काल सकाळी ६ वाजल्यापासून मांडवीवरील एक पूल बंद केल्यामुळे सकाळी १० पर्यंत महामार्गावर वाहनांची कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबलचक रांगा थेट कोकेरो सर्कलपर्यंत लागल्या होत्या.
काही वाहनचालकांनी आपली वाहने पर्वरीतील अंतर्गत मार्गावरून वळविल्याने सर्व अंतर्गत मार्गांवरही वाहने खोळंबल्याने लोकांचे हाल झाले. कोंडीत सापडलेल्या वाहनांना तीन चार ठिकाणी छोटे अपघात झाल्याने अडचणीत अधिक भर पडली. वाहतूक पोलिसांचे योग्य नियंत्रण नसल्याने अनेक ठिकाणी वाहने तासनतास अडकून पडली होती.
बांधकामासाठी एक पूल बंद करण्याची पूर्वसूचना दिली जात नसल्याने महामार्गावरील वाहनांच्या कोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागते. कामाच्या दिवशी पूल बंद ठेवून पुलाचे बांधकाम केल्याने कामावर जाणार्‍या लोकांना उशीर होत असल्याच्या तक्रारी आहेत. शनिवारी किंवा रविवारी (सुटीच्या दिवशी) पूल बंद करून काम करावे अशी मागणी होत आहे. म्हापसा-पर्वरी-पणजी हा एकमेव महामार्ग असल्याने तिसर्‍या मांडवी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.