पर्वरीत ट्रकच्या धडकेत कॉलेज विद्यार्थी ठार

0
67

मॉल दी गोवा समोरील पणजी-म्हापसा महामार्गावर रामनगर (बेती) येथील नझीरखान इस्माईल पास्तीनी (२४) याचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. एका मालवाहू ट्रकने त्याला ठोकरून घटनास्थळावरून पलायन केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला असून ट्रकचा मागोवा घेण्यासाठी पर्वरी पोलिसांचे एक पथक महाराष्ट्रात रवाना झाले आहे.

नझीरखान म्हापसा येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या रिसर्च सेंटर महाविद्यालय (आसगाव)मध्ये बीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असून नेहमीप्रमाणे तो महाविद्यालयात जात असताना पर्वरी-म्हापसा महामार्गावरील सिण्डीकेट बँकेसमोर नझीरखान याच्या दुचाकीला (क्र. जीए- ०१, वाय- ३७८०) महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत संशयित आयशर मालवाहू ट्रकने (क्र. एमएच- ४०, एके- ७०४७) धडक दिल्याने नझीरखान रस्त्यावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी उपनिरीक्षक अमीर तरल यांनी अपघाताचा पंचनामा केला. पर्वरी पोलिसांनी नजीकच्या दुकानावरील सीसीटीव्ही फूटेजवरून संशयित ट्रकचा छडा लागला असून पोलिसांनी सर्वत्र संदेश पाठवून त्या ट्रक चालकाला ताब्यात घेण्यासाठी सतर्क करण्यात आले आहे. पोलिसांनी संशयित ट्रकचालकावर भा. दं. सं. २७९, ३०४ (ए) १३४ कलमाखाली गुन्हा नोंदविला असून निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.