पर्रीकर मंत्रिमंडळाचा आज शपथविधी

0
86

>> राजभवनवर संध्या ५.३० वा. सोहळा : विधानसभेत २० रोजी शक्तीप्रदर्शन

 

मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील ९ सदस्यीय मंत्रिमंडळाचा शपथविधी आज संध्याकाळी ५.३० वाजता राजभवनवर होणार असून त्यासाठीची सगळी तयारी काल जोरात सुरू होती. भाजप नेते फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या तीन, मगोच्या दोन, गोवा फॉरवर्डच्या दोन व दोन अपक्ष मिळून ९ आमदारांचा आज शपथविधी होणार आहे. दरम्यान, मनोहर पर्रीकर यांनी काल संरक्षणमंत्रीपदाचा राजिनामा दिला.
मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर तर भाजपचे फ्रान्सिस डिसोझा, नीलेश काब्राल यांचे शपथग्रहण होईल. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई व जयेश साळगांवकर, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर व बाबू आजगांवकर व अपक्ष आमदार रोहन खंवटे (पर्वरी) व गोविंद गावडे (प्रियोळ) यांचे शपथग्रहण होईल. तर नंतर दुसर्‍या टप्प्यात आणखी तीन आमदारांचे शपथग्रहण होणार आहे. त्या आमदारांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत.
२० रोजी विधानसभा अधिवेशन
दरम्यान, गोवा विधानसभेचे अधिवेशन सोमवार दि. २० रोजी होणार आहे. अधिवेशनात सभापतींची निवड, विश्‍वासदर्शक ठराव व अर्थसंकल्प असे कामकाज असेल, असे डिसोझा यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.
कुणाला कोणती खाती देण्यात येतील हे सांगण्यास नकार देताना आपणाला त्याची माहिती नाही. त्याची सगळी जबाबदारी ही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची असल्याचे डिसोझा यांनी स्पष्ट केले. मनोहर पर्रीकर हे संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन गोव्यात येत असल्याने त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभेवर निवडून यावे लागणार
आहे.
दरम्यान, मगो व गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रत्येकी तीन आमदार असून त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा दिल्याने त्या पक्षांचे प्रमुख अनुक्रमे सुदिन ढवळीकर व विजय सरदेसाई यांना वजनदार खाती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
विजय सरदेसाई यांनी तिघाही आमदारांना मंत्रीपदे देण्याची मागणी केली होती, असे वृत्त आहे. मात्र, तिघां पैकी तिघांना मंत्रीपदे दिल्यास भाजपच्या आमदारांना मंत्रीपदे देताना अडचण होणार असल्याने दोघांनाच मंत्रीपदे देणे शक्य असल्याचे सरदेसाई यांना कळवण्यात
आले.
अपक्षांविषयीही उत्सुकता
दरम्यान, भाजपला आपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार रोहन खंवटे व गोविंद गावडे यांना कोणती खाती दिली जातात याविषयीही लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे हे दुसर्‍यांदा निवडून आलेले असून त्यामुळे गोविंद गावडे यांच्यापेक्षा त्यांना मोठे खाते दिले जाते की काय हे पहावे लागेल. गोविंद गावडे हे अपक्ष आमदार असले तरी भाजपने त्यांना आपला पाठिंबा दिला होता.

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात
कॉंग्रेस सुप्रीम कोर्टात
गोवा विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या ४० आमदारांमध्ये कॉंग्रेसला सर्वात जास्त म्हणजे १७ जागा मिळालेल्या असूनही फक्त १३ जागा मिळालेल्या भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देण्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्या निर्णयास कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून आज सकाळी १०.३० वा. या अर्जावर तातडीने सुनावणी होणार आहे.
न्यायालयाला सुट्टी असूनही वरील अर्जाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य न्यायमूर्ती जगदिश केहर यांनी विशेष खंडपीठापुढे सुनावणी घेण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे गोमंतकीय जनतेच्या नजरा न्यायालयकडे लागल्या आहेत. प्रदेश कॉंग्रेस विधीमंडळ नेते बाबू कवळेकर यांनी न्या. रामेश्‍वर पंडीत यांनी अशाच विषयावर दिलेला निवाडा न्यायालयासमोर ठेवला आहे. या याचिकेवर कॉंग्रेसतर्फे अभिषेक मनू सिंघवी व कपिल सिब्बल युक्तीवाद करणार
आहेत.
भाजपची आमदारसंख्या अवघी १३ असूनही त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्याची राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याचा दावा कवळेकर यांनी याचिकेत केला आहे.