१३-१४ रोजी पर्रीकरांचे आगमन शक्य
येत्या १३ अथवा १४ रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून अन्य दोघा मंत्र्यांना लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मंत्रिमंडळात सामावून घेण्यात येणार आहे. याच काळात मंत्र्यांचे खाते वाटपही करण्यात येणार असल्याचे भाजपमधील सूत्रानी काल स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री बनलेले मनोहर पर्रीकर हे १३ अथवा १४ रोजी गोव्यात येणार असून त्यादिवशी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अन्य नेते पुढील दिशा ठरवणार आहेत.मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात मच्छिमारी खाते सांभाळणारे व परवा नव्या मंत्रिमंडळाच्या शपथग्रहण सोहळ्यात ज्यांचे शपथग्रहण होऊ शकले नव्हते ते म्हणजेच आवेर्तान फुर्तादो यांना या विस्ताराच्यावेळी मंत्रिमंडळात सामावून घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
रिक्त झालेल्या जागी अन्य एक मंत्री म्हणून कुणाला स्थान देण्यात येणार आहे ते स्पष्ट झालेले नसले तरी गोवा विकास पक्षाचे आमदार मिकी पाशेको, भाजपचे आमदार मायकल लोबो, प्रमोद सावंत व वेळ्ळीचे अपक्ष आमदार बेंजामिन सिल्वा या आमदारांच्या नावांची चर्चा चालू असल्याचे समजते.
अल्प संख्यांक समाजातील नेते असलेल्या फ्रान्सिस डिसोझा यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी न लावल्याने दुखावल्या गेलेल्या सासष्टी तालुक्यातील ख्रिस्ती समाजाला खूष करण्यासाठी भाजप मिकी माशेको अथवा बेंजामिन सिल्वा यांची मंत्रीपदी वर्णी लावू शकते असे वृत्त असून या पार्श्वभूमीवर माजी पर्यटनमंत्री असलेल्या मिकी पाशेको यांनी आपली मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी जोरदार लॉबिंग सुरु केले असल्याचे समजते.
दरम्यान, पहिल्यांदाच आमदार म्हणून आणि तेही भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या मायकल लोबो तसेच प्रमोद सावंत यांनीही मंत्री बनण्यासाठी आपले घोडे दामटण्यास सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर कुणाला मंत्रीपद मिळते ते पहावे लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.