निवडणूक लढविण्याबाबत ठाम पणजीचा आमदार म्हणून मनोहर पर्रीकर यांच्यानंतर मीच योग्य नेता ठरणार असून त्यामुळेच आमदारकीचा राजीनामा देऊन अपक्ष आमदार म्हणून पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय बदलणार नसल्याचे सांताक्रुझ मतदारसंघाचे कॉंग्रेस आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पणजी मतदारसंघाचा तीन प्रमुख समस्या भेडसावत असून पणजीचा आमदार बनल्यास आपण या तीन समस्या सोडवू शकतो. कचरा समस्या, पार्किंग समस्या व घाणेरडा बनलेला सांतइनेज नाला या त्या तीन प्रमुख समस्या असल्याचे ते म्हणाले. पणजीतील कचरा समस्या सोडवणे शक्य आहे. त्यासाठी बायंगिणी येथे कचरा प्रकल्प उभारण्याची गरज नाही. वायंगिणी हे जुने गोवे येथे असून पर्यटन व जागतिक वारशाच्या दृष्टीने जुने गोवे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कचरा प्रकल्प कदंब बसस्थानकाजवळील हिरा पेट्रोलपंपजवळ उभारणे शक्य आहे. तेथे त्यासाठी जमीनही संपादीत केलेली आहे. त्याशिवाय ताळगांव येथेही एक कचरा प्रकल्प करणे शक्य आहे. हे दोन प्रकल्प झाल्यास पणजीतील कचरा समस्या सुटू शकेल. पार्किंग समस्या सोडवण्यासाठीही आपणाकडे तोडगा असल्याचा दावा त्यानी केला. पणजीचा आमदार बनल्यास आपण प्राधान्यक्रमाने सांतइनेज नाल्याच्या साफसफाईचेही काम हाती घेणार असल्याचे ते म्हणाले. आमदारकीचा राजीनामा देऊन नव्याने निवडणूक लढवण्याचा मोठा धोका तुम्ही पत्करत आहात असे वाटत नाही काय? असे विचारले असता आपण आतापर्यंत अशा प्रकारे धोका पत्करतच जगत आलो असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय तुम्ही का घेतला आहे, असे विचारले असता कॉंग्रेसमध्ये राहण्यापेक्षा एक अपक्ष आमदार म्हणूनच आपण चांगले काम करू शकणार असल्याचे आता आपणाला वाटू लागल्याचे ते म्हणाले. भाजपने पणजीतून तुम्हाला उमेदवारी दिल्यास स्वीकारणार काय असे विचारले असता अशा जर तरच्या प्रश्नांना काही अर्थ नसतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपण सांताक्रुझचा आमदार म्हणून राजीनामा दिल्यास तेथून आपला पूत्र निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त हे निराधार असल्याचे ते म्हणाले. मात्र, माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस किंवा त्यांचा पुत्र रुदाल्फ फर्नांडिस यांना सांताक्रुझमधून निवडून येऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.