मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावरील तिसर्या टप्प्यातील उपचारांना येत्या सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेणार्या मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राज्यातील बहुतांश मंत्र्यांशी काल दूरध्वनीवरून संपर्क साधून एकंदर प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती घेतली.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, आरोग्य मंत्री विश्वजित राणे व इतर मंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला आहे.
मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या वैद्यकीय उपचारांचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून योग्य पद्धतीने निरीक्षण केले जात आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांच्याशी आपण सात ते आठ वेळा दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे. ते अमेरिकेतील डॉक्टरांचा सल्ला मिळाल्यानंतर गोव्यात परततील, असे आमदार काब्राल यांनी सांगितले.