पर्ये मतदारसंघात राणे पितापुत्र आमनेसामने

0
9

येत्या विधानसभा निवडणुकीत आपण आपले वडील प्रतापसिंह राणे यांच्याविरोधात पर्ये मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल जाहीर केले. पर्ये मतदारसंघातून आपण निवडणुकीत उतरणार असल्याचे काल प्रतापसिंह राणे यांनी सांगितल्यानंतर विश्‍वजीत यांनीही आपण पर्येतून लढणार असल्याचे सांगितले.

यावेळी विश्‍वजीत यांनी आपल्या वडिलांनी जर या निवडणुकीतून माघार घेतली नाही तर आपण त्यांचा तब्बल १० हजार मतांनी पराभव करून पर्येतून निवडून येणार असल्याचे सांगितले.
पर्येचे आमदार तथा ज्येष्ठ कॉग्रेस नेते प्रतापसिंह राणे यांनी काल आपण येती विधानसभा निवडणूक कॉंग्रेसच्या उमेदवारीवर पर्ये मतदारसंघातून लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. पर्ये मतदारसंघातील नागरिकांनी आपण निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली असून त्यामुळे आपण या निवडणुकीत उतरणार असल्याचे प्रतापसिंह राणे यांनी काल स्पष्ट केले. यानंतर काही वेळातच विश्‍वजीत यांनी आपण पर्येतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले.

या पार्श्‍वभूमीवर बोलताना विश्‍वजीत यांनी, माझ्या वडिलांचे आता वय झालेले आहे. त्यामुळे त्यांनी आता राजकीय संन्यास घेऊन उर्वरित आयुष्य विश्रांती घेण्यात घालवावे असा सल्ला प्रसारमाध्यमाद्वारे प्रतापसिंह राणे यांना दिला.

वयपरत्वे आपल्या वडिलांची प्रकृती त्यांना साथ देत नसल्याने गेल्या सुमारे २० वर्षांपासून त्यांच्या मतदारांना भेटणे, त्यांचा प्रचार करणे ही सगळी कामे आपणच करत असल्याची माहिती विश्‍वजीत यांनी यावेळी दिली. वडिलांच्या मतदारांची कामे पूर्ण करणे तसेच त्यांच्या अडीअचडणींकडे लक्ष देणे ही कामेही आता आपणच करत असल्याचे विश्‍वजीत यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपल्या वडिलांनी आयुष्यात बरेच काही मिळवलेले आहे. आता कॉंग्रेस पक्ष रसातळाला गेलेला आहे. त्यामुळे आपले वडील निवडून आले तरी त्यांना कोणतेही पद मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी आता सन्मानपूर्वक राजकीय संन्यास घेणेच योग्य ठरणार असल्याचे विश्‍वजीत यांनी काल स्पष्ट केले.

कॉंग्रेसचे गेल्या निवडणुकीत १७ आमदार निवडून आले होते. त्यातील कॉंग्रेसमध्ये आता मडगावचे दिगंबर कामत व पर्येचे प्रतापसिंह राणे हे केवळ दोनच आमदार राहिलेले आहेत.

कॉंग्रेस नेत्यांचा दबाव
माझे वडील प्रतापसिंह राणे यांना त्यांची प्रकृती साथ देत नसतानाही कॉंग्रेसचे काही नेते तसेच त्यांचे काही कार्यकर्ते त्यांना निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोपही यावेळी विश्‍वजीत राणे यांनी केला.