पर्यटनास चालना देण्यासाठी भारत गौरव रेलगाड्या

0
24

>> केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांची घोषणा

पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने सरकार १८० ‘भारत गौरव’ गाड्या सुरू करण्याचा विचार करत असल्याची घोषणा काल मंगळवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते म्हणाले की, रेल्वेने या उद्देशासाठी ३०३३ डबे राखीव ठेवले असून नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी अर्ज मागवले आहेत.

आम्ही ‘भारत गौरव’ गाड्यांचे वाटप केले आहे आणि ३०३३ डबे राखीव ठेवले आहेत. त्यासाठी अर्ज घेण्यास सुरूवात केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भागधारक ट्रेनमध्ये फेरफार करतील आणि चालवतील आणि रेल्वे देखभाल, पार्किंग आणि इतर सुविधांमध्ये मदत करेल अशी माहिती यावेळी मंत्री वैष्णव यांनी दिली.

पर्यटनाला चालना
मंत्री वैष्णव यांनी, पर्यटनाला चालना देणे हा या सेवेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. हा पूर्णपणे नवीन विभाग आहे. ही नियमित रेल्वे सेवा नाही. ‘भारत गौरव’ ट्रेनचा मुख्य उद्देश पर्यटनाला चालना देणे हा आहे आणि त्याला अनेक पैलू असल्याची माहिती यावेळी रेल्वेमंत्र्यांनी दिली. रामायण स्पेशल ट्रेनच्या कर्मचार्‍यांच्या पोशाखाशी संबंधित वादाबद्दल बोेलताना त्यांनी, जेव्हा आपण संस्कृतीतील कोणत्याही मुद्द्याला सामोरे जातो तेव्हा त्यात अनेक संवेदनशील मुद्दे असतात. डिझायनिंग, खाद्यपदार्थ, पोशाख आणि इतर गोष्टींमध्ये आपण जाणीवपूर्वक लक्ष घातले पाहिजे. त्यामुळे आपण हे शिक्षण घेऊन पुढे जायला हव असे वैष्णव यांनी पुढे बोलताना सांगितले.

दरम्यान, भारतीय रेल्वेने काही लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर रामायण विशेष गाड्यांवरील आपल्या सेवा कर्मचार्‍यांचे भगवे पोशाख काढून घेतले. सेवा कर्मचार्‍यांच्या व्यावसायिक पोशाखात पूर्णपणे बदल करण्यात आला आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.