पर्यटनाच्या नव्या दिशा

0
18

गोव्यात पावसाळी पर्यटनाला चालना देण्याचा विचार पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी बोलून दाखवला आहे. गेल्या काही वर्षांत गोव्यात पावसाळ्यातही दाखल होणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेतली, तर सरकारचे हे पाऊल अगदी योग्य ठरेल. आजवर ऑक्टोबर ते मार्च हा गोव्यातील पर्यटन हंगाम मानला जात असे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाला की समुद्रकिनाऱ्यांवर सगळा गाळ वाहून येत असल्याने आणि पावसाळ्यात तेथील जलक्रीडाही बंद राहत असल्याने पर्यटक त्याकडे पाठ फिरवत. मात्र, गोव्यात समुद्रकिनाऱ्यांखेरीज खूप काही पाहण्यासारखे, अनुभवण्यासारखे आहे याचा आजवर कधी विचारच झाला नाही. अधूनमधून हिंटरलँड टुरिझमच्या घोषणा जरूर झाल्या, परंतु प्रत्यक्षात त्यासंदर्भात फारसे काही घडलेले नाही. नाही म्हणायला म्हादईवर पावसाळ्यात व्हाईट वॉटर राफ्टिंगसारखे काही प्रयोग झाले तेवढेच. परंतु गोव्याचे पर्यटनक्षेत्र हंगामात लाखोंची गर्दी आणि पावसाळ्यात मात्र मोजके दर्दी असे हेलकावे घेत राहिले. त्यामुळे पावसाळ्यातही या क्षेत्रात पर्यटकांची चहलपहल रहावी यासाठी प्रयत्न होणार असतील तर ते स्वागतार्ह आहे. गोवा हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ आहे, परंतु आजवर ही कीर्ती केवळ त्याच्या स्वच्छ, प्रशस्त समुद्रकिनाऱ्यांमुळेच आहे. गोव्याचे पर्यटन केवळ ह्या समुद्रकिनाऱ्यांच्या नैसर्गिक देणगीवर चालत आले आहे. इतर राज्यांमध्ये मनुष्यनिर्मित साधनसुविधांचा आणि आकर्षणांचा विकास होत असतो, तसे गोव्यात पाहण्यासारखे काहीही नाही. देशी पर्यटक असतील तर येथील खासगी व्यवस्थापनांनी व्यवस्थित सांभाळलेली मंदिरे त्यांना खुणावतात तेवढीच. बाकी गोव्याच्या अंतर्भागातील निसर्गसौंदर्य, तेथील संस्कृती यापासून हे पर्यटक बहुतांशी दूरच राहिले, कारण मुळात त्यांच्यासाठी त्या भागात पुरेशा साधनसुविधाच उभ्या राहिल्या नाहीत. अलीकडच्या वर्षांत स्पाईस फार्मचे गोव्यात पेव फुटले, परंतु गोव्याच्या पूर्वभागामध्ये खाणींनी केलेली धूळधाणच पाहायला मिळत राहिली. त्यामुळे तेथे पर्यटकांसाठी सोयीसुविधा उभारण्याच्या फंदात कोणी पडले नाही. खाणी बंद झाल्या आणि हा परिसर पुन्हा जुन्या दिमाखाने झळाळून उठला. त्यामुळे तेथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठीही अलीकडे पर्यटक पावसाळ्यात गोव्यात दाखल होऊ लागले आहेत. मात्र या पर्यटनाला सुनियोजित स्वरूप देण्याची खरोखरच गरज आहे. मुळात त्यांच्यासाठी होम स्टेसारख्या सुविधा मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या पाहिजेत. नेत्रावळीसारख्या गावामध्ये नागरी सहभागातून असे काही प्रकल्प उभे राहिले असले, तरी स्थानिकांच्या सहभागानिशी महाराष्ट्रात, विशेषतः कोकणात ज्याप्रमाणे ब्रेड अँड ब्रेकफास्ट सुविधा उभ्या राहिल्या आहेत, तशी सोय गोव्यात दिसत नाही. हे चित्र बदलण्याची गरज आहे. पावसाळ्यात धबधबे हे मोठे आकर्षण असते. मात्र, धबधबे म्हटल्यावर मद्यधुंद पर्यटकांचा गोंधळ असेच समीकरण बनले आहे, त्यामुळे कुटुंबवत्सल माणसे तेथे फिरकू पाहत नाहीत. या धबधब्यांवर सुरक्षात्मक उपाययोजनांचीही वानवा आहे. नुकतेच मैनापि धबधब्यावर दोघे बुडाले. अशा बातम्या पावसाळ्यात हमखास येत असतात. त्यामुळे धबधबे हे आकर्षण बनवायचे असेल तर आधी तेथे सुरक्षात्मक व्यवस्था उभी केली गेली पाहिजे. पावसाळ्यातील पदभ्रमणाचे खऱ्या निसर्गप्रेमी पर्यटकांना मोठे आकर्षण बनू शकते, परंतु त्यासाठीही सुविधांची गरज आहे. आजवर पावसाळ्यात होणाऱ्या सांजांव उत्सवाला महत्त्व दिले जात असे. यंदा माशेलच्या चिखलकाल्याचीही सरकारी स्तरावर प्रसिद्धी करण्यात आली. केवळ पावसाळी पर्यटनाची जाहिरातबाजी केल्याने सरकारचे कर्तव्य संपत नाही. पावसाळ्यात येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांना पर्यायी आकर्षणस्थळांची माहिती देणे, त्यांच्यासाठी तशा सफरी आयोजित करणे आणि मनमुराद आनंद लुटू देणे यासाठी योग्य नियोजन लागेल. ऑफ सिझन असल्याने हॉटेलांचा दरही या दिवसांत कमी असतो. पर्यटकांची मागणी वाढू लागली तर हॉटेल, टॅक्सी, रिक्षा आदी व्यवसायांनाही पावसाळ्यात बरकत येऊ शकते. पावसाळी पर्यटनाचा विकास जरूर व्हावा, परंतु पावसाळी पर्यटन म्हणजे केवळ बेवड्यांचे पर्यटन होणार नाही आणि त्याचा स्थानिक नागरिकांना उपद्रव होणार नाही याचीही काळजी सरकारला घ्यावी लागेल. पावसाळ्यात पावसाने तजेलदार झालेले गोव्याच्या अंतर्भागाचे निसर्गसौंदर्य आणि श्रावणातील सात्विक आहार यांची सांगड घालून पर्यटकांना गोव्याची आगळी अनुभूती देता येण्यासारखी आहे. गोव्याचा सर्वांत मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात भक्तीमय पर्यटनाचा विकास करता येण्यासारखा आहे. करण्यासारखे खूप आहे. त्यासाठी फक्त घोषणा नव्हेत, तर कृतीची गरज आहे.