पर्यटनाची ऐशी तैशी

0
108

राज्यात पर्यटकांचे लोंढे यायला सुरूवात झाली आहे आणि पर्यटकांच्या या वाढत्या संख्येबरोबरच आपल्या मूलभूत साधनसुविधांमधील गंभीर त्रुटीही उघड्या पडू लागल्या आहेत. नववर्ष प्रारंभ अद्याप दूर असतानाच जे चित्र गोव्याच्या रस्तोरस्ती दिसू लागले आहे, ते पाहाता डिसेंबर अखेरीस राज्याच्या किनारपट्टीत काय परिस्थिती असेल याची कल्पनाही करवत नाही. रस्तोरस्ती वाहतुकीची प्रचंड कोंडी, त्यामुळे भांबावलेले, कातावलेले पर्यटक, पर्यटनस्थळांवर वाहने उभी करण्यासही नसलेली जागा, स्वच्छतालयांची अत्यंत तुटपुंजी संख्या, हॉटेलांमध्ये झुंबड उडाली असल्याने अव्वाच्या सव्वा वाढवले गेलेले दर, शॅक्समधून चाललेली लुटालूट, असे पर्यटन विकासास बाधक आणि मारक असे चित्र आज सर्वत्र दिसते आहे. जेथे आपल्या लोकसंख्येहून दुप्पट संख्येने पर्यटक येतात अशा गोव्यामधील ही परिस्थिती अत्यंत विदारक म्हणावी लागेल. पर्यटकांच्या वाहनांना रस्ते अपुरे पडू लागले आहेत. ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा फटका स्थानिकांनाही बसू लागला आहे. त्यातून स्थानिक आणि पर्यटक यांच्यात तणावाचे प्रसंग उद्भवू शकतात. यापूर्वी अशा हाणामार्‍या झालेल्या आहेत. आपल्या बहुतेक पर्यटनस्थळांवर सुविधांच्या बाबतीत तर सारा आनंदीआनंदच आहे. गोव्याचे आकर्षण म्हणजे समुद्रकिनारे. या समुद्रकिनार्‍यांची मौज लुटण्यासाठीच बहुसंख्य पर्यटक गोव्यात येतात. पण तेथे त्यांना मूलभूत सुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आपण मान्य करणे आवश्यक आहे. कळंगुटच्या विकासाच्या योजना अजूनही पेंड खात आहेत आणि बहुमजली पार्कींग प्रकल्पाअभावी पर्यटकांची गैरसोय होत असल्याचे खुद्द स्थानिक आमदार मायकेल लोबो सांगत आहेत. वाघातोरसारख्या अनेक लोकप्रिय किनार्‍यांवर तर पर्यटकांसाठी संध्याकाळी पुरेशा उजेडाचीदेखील व्यवस्था नाही. बहुतेक ठिकाणी अरुंद रस्ते, त्यात दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे, जागा मिळेल तेथे अंदाधुंदपणे उभी केलेली वाहने यामुळे येथे सुटी आनंदात घालवण्यासाठी म्हणून येणार्‍या पर्यटकांना मनःस्ताप मात्र सहन करावा लागतो आहे. अलीकडील वर्षांमध्ये गोव्याच्या जवळच्या कोकण किनारपट्टीवर पर्यटकांची संख्या वाढते आहे, त्याचे कारण गोव्याकडे त्यांनी पाठ फिरवली आहे हेच आहे. नवनवे पर्यटक भले येत असतील आणि संख्यात्मक वाढ दिसून येत असेल, परंतु त्यांना ही गोवा भेट सुखकर होते की नाही याचा विचार होणार आहे की नाही? पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांना काही करून दाखवण्याची इच्छा आहे. पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी त्यांची धडपडही चाललेली दिसते. त्याची चांगली फळेही दिसू लागली आहेत, परंतु पर्यटकांच्या वाढत्या संख्येसरशी मूलभूत साधनसुविधांवरील ताणही वाढत असतो. त्यांचा ताळमेळ साधला न गेल्याने झुंडीने येणारे पर्यटक आणि त्यातून निर्माण झालेली अनागोंदी असे आज गोव्यातील पर्यटनक्षेत्रातील चित्र आहे. खाण व्यवसायाचा फुगा जसा फुटला तसाच गोव्याच्या पर्यटनाचा फुगाही एक ना एक दिवस फुटणार आहे. त्यामुळे राज्याच्या पर्यटनक्षेत्राच्या भवितव्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. राज्य सरकारने गोव्याचा पंचवीस वर्षांसाठीचा पर्यटन मास्टरप्लॅन तयार करण्याचे काम सल्लागारांना दिले आहे हे खरे, परंतु त्याच्या आनुषंगिक बाबींवरही विचार करणे आवश्यक आहे. पर्यटकांची सुरक्षा, सुविधा आणि स्वच्छता या त्रिसुत्रीचा विचार करून योग्य नियोजन होण्याची गरज आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या बाबतीत सध्या भगवान भरोसे कारभार चालला आहे असे दिसते. कळंगूटसारख्या किनार्‍यावर तर मुंगीला शिरकाव करायलाही जागा नसते अशी आजची परिस्थिती आहे. पर्यटनस्थळांवर लाखो पर्यटकांची गर्दी होत असताना हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे पोलीसही दिसत नाहीत. गर्दीचे व्यवस्थापन करता येईल अशी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर निव्वळ चेंगराचेंगरीत शेकडोंचा बळी जाऊ शकतो. या सार्‍या त्रुटींचा आणि गैरसोयींचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. येणार्‍या पर्यटकांना त्यांची गोवा भेट सुखकर आणि आनंददायक व्हायला हवी. त्या दिशेने त्यांना किमान सुविधा तरी मिळायला हव्यात. त्या दिशेने अजून खूप काही करणे आवश्यक आहे. नुसत्या पर्यटक संख्या वाढणे पुरेसे नाही!