>> वास्कोतील टॅक्सी व्यावसायिकांच्या बैठकीत आश्वासन
>> डिजिटल मीटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार
राज्यात येत्या निवडणुकीत आपची सत्ता आल्यास गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांसाठी ध्येय धोरण राबवून टॅक्सीवाल्यांना सामावून राज्यात पर्यटक टॅक्सी महामंडळ स्थापन करण्यात येईल. एखाद्या टॅक्सी चालकाला अपघात झाल्यास त्याचा पूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे, असे आश्वासन काल आम आदी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले.
दाबोळी नवेवाडे येथील जय संतोषीमाता संस्थानच्या सभागृहात पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांच्या समस्यांविषयी आयोजित बैठकीत श्री. केजरीवाल बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत गोव्याचे आपचे मुख्य निमंत्रक राहुल म्हाबरे, उपाध्यक्ष तथा दाबोळी मतदारसंघाचे प्रमुख प्रेमानंद नानोस्कर, उपाध्यक्ष संदेश तेलेकर, सरचिटणीस पुतू गावकर, वोल्गा व्हिएगस, कळंगुटचे पंच सुदेश मयेकर, गोवा टॅक्सीचालक संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत व आपचे नेते उपस्थित होते.
उच्च न्यायालयाने टॅक्सी मीटरसाठी दिलेल्या आदेशामुळे टॅक्सी व्यावसायिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयात टॅक्सी व्यावसायिकांची बाजू योग्यरित्या मांडलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने अशा प्रकारचा आदेश दिला आहे. या आदेशाला आप पुढच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली.
टॅक्सी व्यावसायिकांना संपवण्याचा कट
पुढे बोलताना केजरीवाल यांनी, राज्य सरकार टॅक्सी व्यावसायिकांना संपवण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. गोव्यात टॅक्सी व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्याचे षड्यंत्र राज्य सरकार करत असून आप टॅक्सी व्यवसायिकांच्या बाजूने ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही केजरीवाल यांनी दिली. दिल्लीत आपचे सरकार स्थापन करण्यास ऑटो रिक्षा, टॅक्सी व्यावसायिकांचा महत्त्वाचा वाटा असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. गोव्यातील व्यवसायिकांना चार आश्वासने देण्यात येणार असून यात गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांचा हक्क देण्यासाठी सरकारचे दोन अधिकारी, तर टॅक्सी व्यावसायिकांच्या चार अधिकार्यांना सामावून महामंडळ स्थापन करणार आहे. एखाद्या टॅक्सी चालकाला अपघात झाल्यास त्याचा पूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार आहे. यात त्यांच्या कुटुंबालासुद्धा मदत करणार आहे. वाहतूक खात्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कार्यालयातील सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करणार आहे. अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.
डिजिटल मीटरविरोधात
सर्वोच्च न्यायालयात जाणार
राज्य सरकारने येथील टॅक्सी व्यावसायिकांना डिजिटल मीटर बसवून एका प्रकारे आर्थिक संकटात टाकले आहे. कोविड महामारीमुळे टॅक्सी व्यवसाय पूर्णपणे बंद असतानाही राज्य सरकारने जबरदस्तीने टॅक्सींना डिजिटल मीटर बसवले. यामुळे टॅक्सी व्यावसायिकांना न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात जावे लागले तेसुद्धा सरकारने टॅक्सी व्यवसायिकांची बाजू योग्यरीत्या मांडली नसल्याची माहिती एका आदेशाद्वारे प्राप्त झाली आहे. डिजिटल मीटरच्याविरोधात आप सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली.
पुढे बोलताना केजरीवाल यांनी, गोव्यात समाजाचे राजकारण करून आप सरकार स्थापन करणार नसून सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती दिली. येथील राजकीय पक्षानी भंडारी समाजाला फक्त मतासाठी उपयोग केला असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. गोव्यातील जनता शिक्षित असून आपच्या बाजूने येऊ लागली असल्याने राज्य सरकारच्या पायाखालची जमीन सरकू लागली असल्याची टीका केजरीवाल यांनी दिली. आपचे उपाध्यक्ष प्रेमानंद नानोस्कर यांनी, गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी आपला पक्ष सदैव पुढाकार घेणार आहे. केजरीवाल यांचे नेतृत्व गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सागितले.
यावेळी आपचे मुख्य निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी, गोव्यातील सरकारने विकासाच्या नावाने भ्रष्टाचार माजवला असल्याची टीका केली.
भंडारी समाजाचा मुख्यमंत्री
गेल्या ६० वर्षांच्या इतिहासात गोव्याला भंडारी समाजाचा एकमेव मुख्यमंत्री प्राप्त झाला आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात भंडारी समाज असल्याने आपचे मुख्यमंत्री भंडारी समाजाचा असेल. मी गोव्यात समाजाचे राजकारण करायला आलेलो नसून फक्त त्यांचा हक्क त्यांना देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे केजरीवाल यावेळी म्हणाले.