पर्यटकांसाठी राज्यात लवकरच ‘सी प्लेन’

0
7

>> पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती

राज्यात लवकरच पर्यटकांसाठी ‘सी प्लेन’ व हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची तयारी जोरात सुरू असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल दिली. हेलिकॉप्टर सेवेसाठी गोवा पर्यटन महामंडळ स्वदेश दर्शन योजनेखाली जुने गोवे येथे हेलिपॅड उभारणार असून ते काम यापूर्वीच सुरू झाले आहे.

हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाने यापूर्वीच खासगी ऑपरेटरची नियुक्ती केली आहे. ही हेलिकॉप्टर सेवा जुने गोवे येथून सुरू होईल. यापूर्वीही राज्यात हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, हेलिपॅडअभावी मिळेल तेथून ही सेवा चालू होती व जनतेच्या विरोधामुळे ती बंद करावी लागली होती, असे खंवटे यांनी स्पष्ट केले. हेलिपॅडचे काम पूर्ण झाल्यानंतर ५ हेलिकॉप्टर राईड्‌स सुरू करण्यात येणार असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले.

सी प्लेनच्या सहा फेर्‍या
सी प्लेनच्या सहा फेर्‍या सुरू करण्यात येणार असून ही सेवा सुरू करण्यासाठीही गोवा पर्यटन विकास महामंडळाने खासगी ऑपरेटर्सशी बोलणी सुरु केली आहे. या ऑपरेटरने आवश्यक ते परवाने मिळवण्यासाठीचे काम सुरू केले आहे, असे खंवटे म्हणाले. ही सी प्लेन सेवा कुठून सुरू करणे शक्य आहे याचा अभ्यास केला जात असून मांडवी नदी, शापोरा नदी, साळावली धरण आदी ठिकाणांच्याही सेवा सुरू करण्यासाठी विचार केला जात आहे. ही सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

हॉप ऑन हॉप ऑफ सेवा
त्याशिवाय पणजी शहरात हॉप ऑन हॉप ऑफ बससेवा सुरू करण्याचा विचार आहे. मात्र, या सेवेमुळे सार्वजनिक बस सेवेवर परिणाम होऊ नये यासाठी योग्य प्रकारे नियोजन करूनच ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे खंवटे म्हणाले.

दक्षिण गोव्यात ‘हॉट एअर बलून’ सेवा सुरू आहे. आणि ती ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होत असते. अशी माहितीही त्यांनी दिली. त्याशिवाय स्वदेश दर्शन योजनेखाली यापूर्वीच आग्वाद येथील एकेकाळच्या कारागृहात वस्तू संग्रहालय उभारण्यात आलेले आहे. तसेच मोरजी खिंडचा विकास करण्यात आलेला आहे. त्याशिवाय विविध किनार्‍यांवर शौचालये, कपडे बदलण्यासाठीच्या खोल्या, सौर ऊर्जा आदींची सोय करण्यात आली असल्याचे पर्यटनमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

पर्यटनाच्या विकासासंबंधी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे चुकीच्या माहितीवर आधारित तसेच गैरसमजाने केलेले आहेत, असेही खंवटे यांनी पुढे स्पष्ट केले.