परवानगीशिवाय संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी चित्रीकरण पडणार महागात

0
10

राज्यातील सरकारच्या मालकीची संरक्षित स्मारके आणि पुरातन स्थळांवर परवानगी न घेता चित्रीकरण करणाऱ्यांना दंड ठोठावण्याचा प्रस्ताव आहे. सरकारच्या मालकीच्या संरक्षित स्मारकावर परवानगी न घेता चित्रीकरण केल्यास 50 हजाराचा दंड आणि इतर संरक्षित स्मारकावर परवानगी न घेता चित्रीकरण केल्यास 20 हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे.

राज्य सरकारच्या पुरातत्त्व खात्याने गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळे आणि अवशेष (सुधारणा) नियम, 2024 अधिसूचित केले आहेत. या सुधारणांबाबत सूचना, आक्षेपासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

या दुरुस्तीच्या माध्यमातून नियमांमध्ये नवीन कलमांचा समावेश केला जाणार आहे. प्राचीन स्मारके, पुरातन स्थळांवर चित्रीकरणासाठी शुल्क आकारण्याच्या कलमांचा समावेश जाणार आहे. सरकारच्या मालकीच्या पुरातन स्थळांवर चित्रीकरणासाठी प्रतिदिन 25 हजार रुपये शुल्क आणि 10 हजार रुपये अनामत रक्कम आकारली जाणार आहे. इतर पुरातन स्थळांवर चित्रीकरणासाठी प्रतिदिन 10 हजार रुपये शुल्क आणि 2 हजार रुपये अनामत रक्कम आकारली जाणार आहे.