परप्रांतीय बोटींची बेकायदा मच्छिमारी; कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

0
112

बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी मच्छिमारांसमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन कर्नाटक, महाराष्ट्र या परराज्यातील मच्छीमारी बोटींकडून राज्यात करण्यात येणार्‍या एलईडी, बुल ट्रॉलिंग पद्धतीच्या मच्छीमारीवर कारवाई करण्यासाठी अधिसूचना जारी करून कारवाई सुरू करण्याची मागणी केली.

कांदोळी येथे स्थानिक मच्छीमारांनी कर्नाटकातील एक मच्छीमारी बोट पकडल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्वरी येथे एक खास बैठक घेतली होती. त्यावेळी बुल ट्रॉलिंग, एलईडी पद्धतीने राज्यात मच्छीमारी करणार्‍यांवर कारवाईसाठी एका महिन्यात नियम तयार करण्याची सूचना केली होती. गोवा राज्यातील समुद्री हद्दीत पुन्हा एकदा परराज्यातील मच्छीमारी बोटींकडून एलईडी पद्धतीने मच्छीमारीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अखिल गोवा रापणकारांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेऊन मच्छीमारांना दिलेल्या आश्वासनाची जाणीव करून देण्यात आली. याबाबतचे नियम लवकरात लवकर अधिसूचित करून कारवाई सुरू करण्याची मागणी करण्यात आली, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रालयाच्या अधिसूचनेप्रमाणे एलईडी, बुल ट्रॉलिंगच्या पद्धतीवर बंदी आहे. परंतु, राज्य सरकारच्या मच्छीमारी खाते, किनारी पोलिसांकडून याबाबत कार्यवाही केली जात नाही, असेही लोबो यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बेकायदा मच्छीमारीवर कारवाईसाठी एका महिन्यात नियम तयार करण्याची सूचना केली होती. मच्छीमारांना दिलेल्या आश्‍वासनाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. बेकायदा मच्छीमारी करणार्‍याला पकडलेल्या मासळीच्या पाच पट दंड ठोठावण्याची गरज आहे. बेकायदा मच्छीमारी बोटीवर कारवाईसाठी आवश्यक बोट संबंधितांना बंदर कप्तान खाते उपलब्ध करून द्यायला तयार आहे. राज्य सरकारी यंत्रणेने कारवाईला सुरुवात करण्याची गरज आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.