पद्मावतीला घाईगडबडीत प्रमाणपत्र नाही ः प्रसून जोशी

0
98

वादग्रस्त ठरलेल्या ‘पद्मावती’ या चित्रपटाला भारतीय सेन्सॉर बोर्डाने अद्याप प्रमाणपत्र दिलेले नाही. आम्ही त्याबाबत कोणतीही घाई करणार नसल्याचे सेन्सॉर बोर्डाचे चेअरमन प्रसून जोशी यांनी काल अनधिकृतपणे पत्रकारांशी बोलताना सांगितले. गरज भासल्यास या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यापूर्वी तो आम्ही इतिहासकारांनाही दाखवू, असे जोशी यांनी यावेळी स्पष्ट केले.

सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी राजपूत वीरांगना व राणी पद्मावती उर्फ पद्मिनी यांच्या जीवनावर बनवलेला चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. त्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी राजस्थान येथील राजपूत समाजाने तसेच अन्य काही हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे. येत्या १ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, वादग्रस्त ठरल्याने सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला अद्याप प्रमाणपत्र दिलेले नाही.

‘गुजरात’मध्येही ‘पद्मावती’वर बंदी

अहमदाबाद : वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या ‘पद्मावती’ सिनेमा गुजरातमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ही घोषणा केली. यापूर्वी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब व राजस्थानमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. ‘पद्मावती’ सिनेमातील दृश्यांवर राजपूत समुदायाने आक्षेप घेतला आहे. गुजरातमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न असल्याने हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार नाही, असे रुपाणी यांनी म्हटले आहे.