>> मच्छिमारी ट्रॉलरवरील भांडणातून खुनानंतर मृतदेह फेकला होता खोल समुद्रात
मालिम-बेती मच्छिमारी जेटीवरील कामगार पद्मलोचन सलीमा (20, रा. ओडिसा) याच्या खून प्रकरणी हार्बरच्या सागरी सुरक्षा पोलिसांनी अखेर त्याच्या तिघा सहकाऱ्यांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. तरुण महाकुल (21, रा. ओडिसा), संजय यादव (27, रा. छत्तीसगड) आणि अंबिग (38, रा. कर्नाटक) अशी अटकेतील तिघांची नावे असून, त्या तिघांनी खोल समुद्रात ट्रॉलरवर झालेल्या भांडणातून पद्मलोचनचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांना काल न्यायालयात हजर केले असताना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हार्बर सागरी सुरक्षा पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रदीप वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जानेवारीच्या रात्री 11.30 ते 9 जानेवारी सकाळी 10 वाजेपर्यंत ‘इस्तेला-2′ नामक मासेमारी ट्रॉलर मालिम जेटीवरून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेला होता. मासेमारीसाठी गेलेल्या त्या ट्रॉलरवर एकूण 32 कामगार होते. तो ट्रॉलर मासेमारी करून मालिम जेटीवर परतला असता त्याच्यावर काम करणारा कामगार पद्मलोचन सलीमा बेपत्ता असल्याचे आढळून आले. पद्मलोचन सापडला नसल्याने नंतर ट्रॉलरचे मालक इशान डिसोझा यांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पर्वरी पोलीस स्थानकात नोंदवली होती. यानंतर 12 जानेवारीला समुद्रात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह तरंगत असल्याचे नौदलाच्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना दिसताच त्यांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन हार्बर सागरी पोलिसांच्या ताब्यात दिला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले होते. चौकशीदरम्यान एका मासेमारी ट्रॉलरवरील कामगार पद्मलोचन बेपत्ता असल्याची तक्रार पर्वरी पोलीस स्थानकात नोंद असल्याचे समोर आले. सदर मृतदेह हा पद्मलोचन याचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी शवचिकित्सेवर लक्ष केंद्रीत केले होते.
शवचिकित्सा अहवालात त्याचा मृत्यू बरगड्यांवर प्रहार झाल्याने नमूद करण्यात आल्याने हा खूनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा खून सहकारी मच्छिमारांनीच केल्याचा संशय होता; परंतु एकाही मच्छिमाराने तोंड उघडले नव्हते; मात्र पोलीस तपासात अखेर खरे खूनी कोण याचा उलगडा झाला. या खून प्रकरणी तीन मच्छिमारांना पोलिसांनी अटक केली आहे. तरुण, संजय, अंबिग आणि पद्मलोचन यांच्यात प्रथम वाद झाला. संतापाच्या भरात तिघांनी पद्मलोचनच्या छातीवर हल्ला करून त्याला ठार केले व मृतदेह समुद्रात फेकला. नक्की कोणत्या कारणावरून त्यांच्यात भांडण झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिघांही संशयितांना सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.