पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया स्थगितीस नकार

0
4

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला अंतरिम स्थगिती देण्यास काल नकार दिला. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया आरक्षणानुसार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य सरकारने गोमेकॉतील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व जमाती आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना 41 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय 5 मे 2023 रोजी घेतला होता. राज्य सरकारच्या निर्णयानुसार पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमातील आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणारी एक याचिका डॉ. मोहनीश सरदेसाई व इतरांनी गोवा खंडपीठात दाखल केली आहे. याचिकादारांनी नवीन प्रवेश प्रक्रियेला अंतरिम स्थगिती देण्याची विनंती केली होती; मात्र न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला. न्यायालयाने सदर याचिका दाखल करून घेतली असून याचिकेवरील पुढील सुनावणी 4 सप्टेंबरला घेतली जाणार आहे.

अभ्यासक्रमासाठी कोणाला किती आरक्षण?
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राज्य कोट्यामधील 41 टक्के जागा एससी, एसटी आणि ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून, 59 टक्के जागा सर्वसामान्य गटासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.