पत्रादेवीत स्थानिकांनी महामार्ग रोखला

0
111

>> रस्त्यावरील खड्‌ड्यांमुळे नागरिकांत नाराजी

सक्राळ धुसकी (पत्रादेवी) येथील नागरिकांनी काल शुक्रवारी रस्त्याबाबत संताप व्यक्त करत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास रोखून धरली. पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळ महाखाजन या राष्ट्रीय महामार्ग ६६ चे नव्याने रुंदीकरण करण्याचे काम जोरात चालू आहे. मात्र ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्यावरील खड्‌ड्यात पडून अपघातात नऊ जणांचे बळी गेले. त्या ठेकेदारांविरुद्ध गुन्हा नोंद करावा अशी मागणी यापूर्वी पेडणेतील जागृत नागरिकांनी पेडणेचे उपजिल्हाधिकारी चद्रकांत शेटकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच ठेकेदारही आपल्या मर्जीप्रमाणे काम करत आहेत. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी काल धुसकी येथे वाहतूक रोखून धरली.

सर्व्हिस रोडवर पडलेले खड्डे न बुजवल्याने अनेकांचे अपघातात मृत्यू झाले आहेत. महामार्गाशेजारील घरांत धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याचे काम करताना कंत्राटदार कुठलीच खबरदारी घेत नाही. वारंवार सूचना करूनही संबंधित ठेकेदारांकडून नियमांचे पालन होत नसल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वाहतूक रोखल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग अडवल्याची माहिती पेडणे मामलेदारांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पेडणे पोलिसही घटनास्थळी पोहोचले. यावेळी मामलेदार अंनत मळिक यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी एकच मागणी केली की कंत्राटदार किंवा कंपनीचे अधिकारी यांना याठिकाणी बोलवा. या विषयावर सुमारे एक तास नागरिक व मामलेदार यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र नागरिकांनी रस्ता कंपनीच्या अधिकार्‍यांनी इथे येऊन रस्ता योग्य पद्धतीने करतो असे आश्वासन द्यावे. मगच रस्ता मोकळा करतो अशी मागणी केली.

अखेर मामलेदार मळिक यांनी, आपण संबंधित कंत्राटदार किंवा अधिकार्‍यांना पेडणे कार्यालयात बोलावून घेऊन तिथे सविस्तर चर्चा करतो असे आश्‍वासन देऊन, वाहतूक मोकळी करा, लोकांची गैरसोय करू नका अशी नागरिकांची समजूत काढल्यानंतर नागरिकांनी रस्ता मोकळा करून दिला व वाहतूक सुरळीत झाली.