पणजी स्मार्ट सिटीच्या कामांचा मुख्य सचिव घेणार फेरआढावा

0
22

>> कंत्राटदार व संबंधितांसमवेत आज बैठक; मोन्सेरात यांची माहिती

राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल हे आज (दि. 16) पणजी स्मार्ट सिटीचे कंत्राटदार व अन्य संबंधितांची चालू असलेल्या कामांचा फेरआढावा घेण्यासाठी एक बैठक घेणार असल्याची माहिती काल पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली.
कामाची योग्य दिशा ठरवून ठराविक वेळेत हे काम कसे पूर्ण करायचे त्यासंबंधी या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. एका ठिकाणचे काम हाती घेतले की ते विनाविलंब एका दमात पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही मोन्सेरात यांनी स्पष्ट केले. रस्त्यांवर करण्यात आलेली सर्व बेकायदेशीर अतिक्रमणे काढून टाकण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पणजी स्मार्ट सिटीच्या कामाचे धोंगडे गेल्या काही वर्षांपासून भिजत पडल्याच्या पार्श्वभूमीवर पणजी शहरातील जनता तसेच विरोधकांकडून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागलेली आहे. या प्रश्नावरून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना काही महिन्यांपूर्वी घेराव घातला होता. तसेच काही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या एका खड्ड्यात पडून एका माजी नगरसेवकाचा मुलगा ठार होण्याची घटना घडल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी मोन्सेरात यांच्यावर खरपूस शब्दांत टीका केली होती. त्या टिकेला प्रत्युत्तर देताना मोन्सेरात यांनी पणजी स्मार्ट सिटीच्या गलथान कारभाराला मनोहर पर्रीकर हेच जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

यानंतर या प्रकरणाला गंभीर स्वरुप प्राप्त झाले होते. मोन्सेर्रात यांनी पर्रीकर यांच्यावर केलेल्या टीकेसंबंधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मौन बाळगल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मुख्यमंत्र्यांनी तंबी देताना छोट्या नेत्यांनी मनोहर पर्रीकर यांच्यासारख्या थोर नेत्यासंबंधी बोलताना संयम बाळगावा व आपण कुणाविषयी बोलत आहोत याचे भान ठेवावे, असे स्पष्ट केले होते.

कामांच्या दर्जाबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही

पणजी स्मार्ट सिटीचे काम येत्या 31 मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा बाबूश मोन्सेरात यांनी केला; मात्र या कामांच्या दर्जाविषयी आपण आता काहीही सांगू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दर्जाविषयी नंतर विचार करावा लागणार असल्याचे अजब वक्तव्य त्यांनी केले. दरम्यान, मोन्सेरात यांनी काल संजीत रॉड्रिग्ज व अन्य काही अधिकाऱ्यांसह सांतइनेज येथे चालू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना केल्या.