चित्ररथ – रोमटामेळ मिरवणूक १४ रोजी
पणजी शिगमोत्सव समितीतर्फे यंदा ६ ते १५ रोजी या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी २७ वा शिगमोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पणजी शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी काल पत्रकार परिषदेत उत्सवाचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला.
आज ६ रोजी आझाद मैदानावर सकाळी गुलालोत्सवाने उत्सवाच्या कार्यक्रमांना प्रारंभ होईल. श्री महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद घेऊन सकाळी ९ वाजता वाजत गाजत शोभायात्रा आझाद मैदानाकडे निघेल. तेथे वाद्यवृंदाच्या तालावर पणजी परिसरातील नागरिक, पर्यटक रंगोत्सवाचा आनंद लुटतील. सर्व जातीभेद, पक्षभेद, हेवे-दावे विसरून उत्स्फूर्तपणे सर्वजण एकमेकांना रंग लावून बेधुंदपणे नाचतील. गेली सात वर्षे हा गुलालोत्सव आगळ्या पध्दतीने साजरा करण्यात येत असल्याचे सांगून श्री. धेंपो यांनी गुलालोत्सवात केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, स्थानिक आमदार सिध्दार्थ कुंकळ्ळकर हेही सहभागी होणार असल्याची माहिती दिली.६ रोजी सायंकाळी ६.३० वा. श्री. ओमकेश ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होईल. ११ रोजी सायं. ५.३० वा. आझाद मैदानावर उभारलेल्या भव्य, कलाकार व्यासपीठावर रंगमंच पूजा व त्यानंतर सायं. ७ वा. टी. व्ही. स्टार कलाकारांचा ङ्गकॉमेडी मसालाफ कार्यक्रम होईल. त्यात आशिश पवार, कमलाकर सातपुते, अरुण कदम, मीरा मोडक व सूत्रनिवेदक योगेश सुपेकर यांचा समावेश आहे. १२ रोजी सायंकाळी ६.३० वा. सत्यवान नाईक प्रस्तुत ङ्गओंकार मेलोडीजफ ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होईल. ज्युनियर जॉनी ऑकर यांची मिमीकी हे या कार्यक्रमाचे आकर्षण राहील. १३ रोजी सायं. ६.३० वा. ङ्गनिषादफ निर्मित ङ्गचांदणे स्वरांचेफ हा विशेष कार्यक्रम होईल. त्यात झी मराठी ङ्गसारेगमपफच्या स्वर नव्या युगाचा कार्यक्रमातील उपविजेते कलाकार महेश कंटे व रेश्मा कुलकर्णी (मुंबई) तसेच पुणे येथील प्रसिध्द युवा गायिका मानसी कार्लेकर, दीक्षित मराठी भावगीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, गझल व निवडक हिन्दी गीतांचा नजराणा पेश करतील.
चित्ररथ व रोमटामेळ मिरवणूक
शनिवार दि. १४ रोजी आपल्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारी भव्य चित्ररथ, रोमटामेळ व लोककलांचा आविष्कार घडविणारी मिरवणूक निघेल. काकुलो बेटाकडून (कला अकादमी जवळून) ही शोभायात्रा सायंकाळी ४ वा. निघेल. १८ जून मार्गाने, ए. बी. चौक, हॉटेल आरोमा, कासा इंटरनॅशनल, एम्. जी. मार्ग, दिल्ली दरबार या मार्गे ही मिरवणूक आझाद मैदानावर विसर्जीत होईल. दरम्यान, सायं. ७.३० वा. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या व कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सौजन्याने लोकनृत्यांचा कार्यक्रम आझाद मैदानावरील व्यासपीठावर होईल.
रात्री ९.३० वा. दारूकामाची आतषबाजी, त्यानंतर रात्री १० वा. रोमटामेळ, चित्ररथ आदी स्पर्धातील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील. रविवार दि. १५ रोजी सायं. ६.३० वा. भाग्यश्री प्रॉडक्शन सोलापूर यांचा बहारदार लावण्यांची मेजवानी देणारा लावण्यखणीफ हा खास कार्यक्रम होईल.
श्रीनिवास धेंपो यांनी सांगितले की पणजी शिगमोत्सव समिती ही गोव्याची अस्सल संस्कृती पणजी राजधानीत शहरी लोकांना व पर्यटकांना दाखविण्यासाठी प्रयत्नशील आहे. एकात्म भावनेने ही समिती कार्य करते. कुठलेही वाद-विवाद न होता एकमताने समितीचे पदाधिकारी निवडले जातात. या उत्सवाला सरकारचाही पूर्ण पाठिंबा मिळतो. यंदा ४५ चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. लाखभर लोक चित्ररथ मिरवणुकीचा दरवर्षी आनंद लुटतात. संस्कृतीबद्दल सजग असलेल्या समविचारी गटाने एकत्र येवून उद्योगपती वै. वासुदेव धेंपो यांच्या अध्यक्षतेखाली पणजी शिगमोत्सव समिती स्थापन केली आणि १९८९ मध्ये प्रथमच चित्ररथ मिरवणूक पणजीत काढली. पर्यटनाला वाव देण्यासाठी पर्यटन खात्याचे तत्कालीन संचालक व्ही. ए. पी. महाजन यांनी शिगमो व कार्निव्हल साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. या सार्वजनिक उत्सवाचे श्रेय त्यांना जाते असे धेंपो यांनी स्पष्ट केले.
सत्कार सोहळा
दरवर्षी प्रमाणे यंदाही संगीत, नाट्य, भजन आदी सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यात आमोणा (डिचोली) येथील रंगकर्मी सुभाष बाबू परब येळेकर, आल्त-रायबंदर येथील तियात्र कलाकार आंद्रे मारियानो डिसोझा व मेणकुरे येथील नाट्य-भजनी कलाकार शिवा बाळकृष्ण परब यांचा समावेश आहे.
धेंपो यांनी सांगितले की चित्ररथ स्पर्धेसाठी गोवा सरकार बक्षिसे पुरस्कृत करते. प्रथम तीन बक्षिसे अनुक्रमे ६० हजार, ५० हजार व ४० हजार, शिवाय उत्तेजनार्थ आहेत. परंतु महागाई लक्षात घेता बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. धेंपो उद्योग समूहातर्फे त्यासाठी योगदान देण्यात येईल व इतर कॉर्पोरेट्सकडून प्रायोजकत्व घेतले जाईल. पत्रकार परिषदेला समितीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम नाईक, कोषाध्यक्ष संदीप नाईक उपस्थित होते.