पणजी ते मिरामार, दोनापावला व बांबोळी या रिंग रोडवर सिटी बससेवा सुरू करण्याचा कदंब महामंडळाचा विचार असून त्यासाठी महामंडळ १६ कोटी रु. खर्चून एकूण ३५ मिनी बसेस खरेदी करणार असल्याची माहिती कदंब महामंडळातील सूत्रांनी दिली. या ३५ बसेसपैकी काही बसेस कुजिरा येथील शाळा प्रकल्पातील शाळांनाही विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी देण्यात येणार आहेत.
पणजी ते मिरामार, दोनापावला व बांबोळी या रिंग रोडवर किती बसेस पाहिजेत याची माहिती गोळा करण्याचे काम महामंडळाने यापूर्वीच हाती घेतले आहे. या मार्गावर आवश्यक तेवढ्या बसेस नसल्याने स्थानिक लोक तसेच पर्यटकांची बरीच गैरसोय होत असते. त्यामुळे आता कदंब महामंडळाने या मार्गावर मिनी बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आठ दिवसांच्या आत या बसेस मागवण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे कदंब महामंडळातील सूत्रांनी सांगितले. या बसेससाठी लागणारे १६ कोटी रु. कदंब महामंडळाला गोवा सरकारकडून मिळणार असून येत्या अडीच महिन्यांच्या आत ही बससेवा सुरू करण्याचा कदंब महामंडळाचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आंतरराज्य मार्गांसाठी २० बसेस
दरम्यान, गोव्यातून कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध भागांत जाणार्या बर्याच बसेस जुन्या झालेल्या असून त्या बदलून त्या जागी नव्या बसेस पुरवण्यासाठी आणखी २० बसेस सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बसेससाठी ९ कोटी रु. एवढा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे. तीन महिन्यांच्या आत या बसेस आणल्या जातील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. याशिवाय केंद्र सरकारच्या अमृत योजनेखालीही बसेस खरेदी करण्यासाठी निधी मिळवण्याच्या प्रयत्नात कदंब महामंडळ असल्याचे सूत्रांनी सांगितले.