ऍड. अजितसिंह राणे करणार नेतृत्व
पणजी महापालिकेचे रोजंदारीवरील ३३३ कामगार व ३०० कायमस्वरूपी कर्मचारी मिळून ६३३ जण आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर जाणार असल्याचे या कामगारांचे नेते ऍड. अजितसिंह राणे यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या संपासंबंधीची नोटीस महापौर सुरेंद्र फुर्तादो व आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांना देण्यात आली आहे. कामगारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन कामगार संघटनेतर्फे महापालिकेला दिले होते, पण महापालिकेने त्यातील एकही मागणी पूर्ण केलेली नाही, तसेच कामगारांना चर्चेसाठीही बोलावले नाही. तीन वेळा महापालिकेला स्मरणपत्रे पाठवण्यात आली, पण त्या पत्रांनाही महापालिकेने दाद दिली नाही. या पार्श्वभूमीवर १६ डिसेंबरपासून कामगार संपावर जात असल्याची नोटीस महापालिकेला देण्यात आली होती. त्यानंतरही महापालिकेने दाद न दिल्याने १६ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. रोजंदारीवरील ३३३ कामगारांपैकी ज्यांनी सेवेत ३ वर्षांचा काळ पूर्ण केलेला आहे, त्यांना अथवा २४० दिवस सलग काम केलेले आहे त्यांना सेवेत कायम केले जावे, रोजंदारीवरील कामगारांचा पगार २२१ रु. वरून ४९९ एवढा केला जावा, सार्वजनिक सुट्या व रविवार या भरपगारी सुट्या जाहीर कराव्यात, निकषानुसार सर्वांना बढत्या देण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.