Home Featured पणजी महानगरपालिका निवडणूक 11 मार्च रोजी

पणजी महानगरपालिका निवडणूक 11 मार्च रोजी

0

>> मतमोजणी 13 मार्च रोजी
>> आजपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
>> मतपत्रिकेद्वारे होणार मतदान
>> पालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू

पणजी महानगरपालिकेची निवडणूक येत्या 11 मार्च 2026 रोजी घेण्यात येणार असून मतमोजणी 13 मार्च 2026 रोजी केली जाणार आहे. निवडणुकीसाठी आज मंगळवार दि. 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उपजिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. मतदान हे मतपत्रिकेच्या माध्यमातून घेतले जाणार आहे. पणजी महानगरपालिका क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी आल्तिनो पणजी येथे आयोगाच्या कार्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिली.

पणजी महानगरपालिकेच्या विद्यमान मंडळाचा कार्यकाळ येत्या 29 मार्च 2026 रोजी पूर्ण होत आहे. पणजी महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी निवडणूक अधिकारी, निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षक, फिरत्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. पणजी महानगरपालिका निवडणूक पक्षीय पातळीवर घेतली जाणार नाही.
मतदानासाठी 48 मतदान केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. उमेदवाराला प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. उमेदवाराला खर्च मर्यादा 2.50 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त डिसोझा यांनी दिली.

11 मार्च 2026 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 यावेळेत मतदान घेतले जाणार आहे. 17 ते 24 फेब्रुवारी 2026 या काळात सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 3 यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. त्यानंतर निवडणूक रिंगणात आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. मतमोजणी 13 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी दिली.

30 प्रभाग, 32,496 मतदार
पणजी महानगरपालिका क्षेत्रात एकूण 30 प्रभाग असून 32,496 मतदार आहेत. त्यात पुरुष 15,225 आणि महिला 17,271 मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक मतदार प्रभाग क्र. 5 मध्ये 1617 एवढे असून सर्वांत कमी मतदार प्रभाग क्र. 16 मध्ये 828 मतदारांचा समावेश आहे.
पणजी महानगरपालिकेच्या 30 प्रभागांपैकी 10 प्रभाग महिला, 8 प्रभाग ओबीसी आणि 1 प्रभाग एसटी वर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. प्रभाग आरक्षण जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले आहे, असेही राज्य निवडणूक आयुक्त डिसोझा यांनी सांगितले.

भाजप पुरस्कृत उमेदवारांचे शुक्रवारी अर्ज ः मोन्सेरात

पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत उमेदवार येत्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती महसूलमंत्री, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
भाजप समर्थक उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजप मुख्यालयात काल एक बैठक घेण्य़ात आली. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री मोन्सेरात यांनी सहभाग घेतला.
महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे, असेही मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले.

पणजी महानगरपालिका निवडणूक आचारसंहितेचा गोवा विधानसभेच्या येत्या 6 मार्च 2026 पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोणताही परिणाम होणार नाही, असे राज्य निवडणूक आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

14 ग्रामपंचायतींसाठी
8 रोजी पोटनिवडणूक

राज्यातील 14 ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या 14 जागांसाठी येत्या 8 मार्च 2026 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 यावेळेत पोटनिवडणूक घेतली जाणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी एका पत्रकार परिषदेत काल दिली.
येत्या 18 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 26 फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. 9 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. पंचायत पोटनिवडणुकीसाठी मामलेदार कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेतले जाणार आहे, असेही आयुक्त डिसोझा यांनी सांगितले.

14 ठिकाणी पोटनिवडणूक
पेडणे तालुक्यातील चांदेल-हंसापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1, मांद्रे पंचायतीच्या प्रभाग 4, डिचोली तालुक्यातील पिळगाव पंचायतीच्या प्रभाग 7, लाटंबार्से पंचायतीच्या प्रभाग 3, बार्देश तालुक्यातील पीळर्ण-मार्ना पंचायतीच्या प्रभाग 1, सिरसई पंचायतीच्या प्रभाग 6, साल्वादोर द मुंद पंचायतीच्या प्रभाग 2, कांदोळी पंचायतीच्या प्रभाग 1, सालसेत तालुक्यातील आके पंचायतीच्या प्रभाग 6, फोंडा तालुक्यातील बोरी पंचायतीच्या प्रभाग 1, वेलिंग कुंकळ्ये प्रियोळ पंचायतीच्या प्रभाग 3, भोम अडकोण पंचायतीच्या प्रभाग 3, केपे तालुक्यातील बाळ्ळी-अडणे पंचायतीच्या प्रभाग 7 आणि काणकोण तालुक्यातील लोलये पोळे पंचायतीच्या प्रभाग 7 मध्ये पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.