पणजी पालिका क्षेत्रातील समस्यांचा आढावा

0
200

पणजी महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ४ हजार जुने विजेचे खांब बदलण्याचा वीज खात्याचा प्रस्ताव आहे. जुन्या वीज वाहिन्यासुद्धा बदलण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी काल दिली.
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पणजी महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी प्रमुख खात्यांच्या अधिकार्‍यांची बैठक महानगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी घेतली. या बैठकीची माहिती देताना महापौर म्हणाले की, बैठकीत महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला आहे. वीज खात्याने रायबंदर, दोनापावल व इतर भागांतील सुमारे ४ हजार जुने विजेचे खांब बदलण्याचा आराखडा तयार केला आहे. पणजी परिसरातील सुमारे ३५० विजेचे जुनाट खांब मोडून पडलेले आहेत. वीज खात्याला खांब बदलण्याचा कामाचा सविस्तर आराखडा सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

पाणी पुरवठा खात्याकडून जलवाहिनी घालण्यासाठी रस्त्यावर खोदकाम केले जाणार आहे. मलनिस्सारण मंडळाकडून मळा परिसरात खोदकाम केले जाणार आहे. गॅस वाहिनी घालण्यासाठी खोदकाम केले जाणार आहे. या सर्व खात्यांना खोदकामाबाबत सविस्तर आराखडा सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. येत्या एप्रिल २०२१ पूर्वी सर्व कामे पूर्ण करून शहरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्याची योजना आहे, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.

मळा पणजी येथे गोवा साधन सुविधा विकास महामंडळाकडून बांधण्यात येणारा पूल अपूर्णावस्थेत आहे. सदर पुलाचे बांधकाम फेब्रुवारीअखेर किंवा मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. स्मार्ट सिटी योजनेखालील विकासकामांवर चर्चा करण्यात आली आहे, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.
पणजी बसस्थानकाजवळील जंक्शन वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहे. पर्यटकांना रस्त्याची योग्य माहिती मिळत नसल्याने गैरसोय होते, तसेच वाहन चालकांना अपघात होतात. त्याठिकाणी वाहतुकीसाठी योग्य नियोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.