पणजी ते चिंबल उड्डाण पूल; दुचाकीसाठी वेगळी लेन
पणजी ते जुने गोवे दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम १० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याची तयारी ठेवली असून संपूर्ण प्रकल्प २०१५ पर्यंत पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. या प्रकल्पात पणजी ते चिंबलदरम्यान, उड्डाणपुलाचा प्रस्ताव असून त्यामुळे म्हापशाहून मडगावला जाणार्यांना पणजी शहरात प्रवेश करावा लागणार नाही.
सुमारे १०५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा अधिकृतरित्या शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.
जुवारी पुलाच्या बांधकामासंबंधीचे सर्व सोपस्कार २६ जानेवारीपर्यंत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सेंट झेवियर शवप्रदर्शन नोव्हेंबरमध्ये होणार असले तरी रुंदीकरणाचा त्यावर परिणाम होणार नाही. १० नोव्हेंबरपर्यंत रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर त्यावरून वाहतूक करण्यास कोणतीही अडचण नाही, असे ते म्हणाले. या मार्गावर दुचाकीस्वारांना वेगळी लेन असेल. सध्या या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. वरील मार्गावरून प्रती दिनी सुमारे ७ ते ८ हजार दुचाकी वाहतूक करतात. त्यांच्यासाठी वेगळा मार्ग केल्याने अपघातांवरही नियंत्रण येऊ शकेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, खांडेपार पुलाच्या कामाची आज निविदा उघडणार असून तळपण व गालजीबाग पुलाचे कामही राज्य सरकारतर्फेच केले जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.