पणजीत सिद्धार्थ! ५३६८ मतांच्या आघाडीने विजयी

0
129
सिद्धार्थ कुंकळकर यांची विजयी मिरवणूक. (छाया : नंदेश कांबळी)

पणजीकरांच्या पर्रीकरांवरील प्रेमाचा पुनःप्रत्यय
पणजी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळकर यांनी कॉंग्रेस उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांचा तब्बल ५३६८ मतांनी पराभव केला. सिद्धार्थ यांना ९९८९ मते मिळाली, तर फुर्तादो यांना ४६२१ मतांवर समाधान मानावे लागले. रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार समीर केळेकर यांना ६२४, तर दुसरे अपक्ष उमेदवार सदानंद वायंगणकर यांना १४० मते मिळाली. ३३० मतदारांनी मतदानयंत्रावरील ‘वरीलपैकी कोणीही नाही (नोटा)’ हा पर्याय निवडला.
मनोहर पर्रीकर यांची संरक्षणमंत्रीपदावर निवड झाल्याने रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक गेल्या १३ फेब्रुवारीस घेण्यात आली होती. काल सकाळी मतमोजणीस सकाळी आठ वाजता सुरूवात झाली व साडेनऊ च्या पूर्वीच तिन्ही फेर्‍यांचा निकाल हाती आला. मतमोजणीस प्रारंभ झाला तेव्हा सुरवातीपासूनच भाजपचे सिद्धार्थ कुंकळकर यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या टप्प्यातील मतमोजणीअंती ते सुमारे १००० मतांनी आघाडीवर होते. दुसर्‍या टप्प्यातील मतमोजणीत त्यांना तब्बल ४३६८ मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय निश्‍चित असल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले. तिसर्‍या फेरीअंती वरील तिन्ही फेर्‍यांचे अंतिम निकाल हाती आले तेव्हा सिद्धार्थ यांची आघाडी ५३६८ मतांची असल्याचे स्पष्ट झाले.
आपल्या उमेदवाराचीच निवड होणार याची खात्री असल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच विजयी जल्लोषाची तयारी केली होती. आपला उमेदवार आघाडीवर असल्याचे स्पष्ट होताच त्यांनी ढोल ताशांचा गजर सुरू केला. कुंकळकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच शहरातून वाजत गाजत त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पक्ष कार्यकर्त्यांच्या आनंदाला व उत्साहाला नुसते उधाण आले होते.
मिळालेली मते
सिद्धार्थ कुंकळकर (भाजप) ः ९९८९
सुरेंद्र फुर्तादो (कॉंग्रेस) ः ४६२१
समीर केळेकर (अपक्ष) ः ६२४
सदानंत वायंगणकर (अपक्ष) ः १४०
वरीलपैकी कोणाला नाही ः ३३०

लोकांच्या अपेक्षांनुसार काम करीन : सिद्धार्थ
या विजयाने माझ्यावरील जबाबदारी वाढली असून लोकांच्या अपेक्षेनुसार यापुढे काम करील अशी ग्वाही पणजी मतदारसंघातून काल निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांनी दिली. शहराचा वाहतुकीचा व कचर्‍याचा प्रश्न आपण प्राधान्यक्रमाने हाताळू असे त्यांनी सांगितले. आजवर पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत आलो आहोत. आता पणजीच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करावे लागेल. त्यासाठी पणजीच्या समस्त नागरिकांचे सहकार्य लागेल. परिश्रम, कष्ट करून पुढे जाऊ असे कुंकळकर यांनी सांगितले. आपल्या विजयाचे श्रेय त्यांनी पणजीतील मतदार व कार्यकर्ते यांना दिले. पणजीच्या मतदारांनी भारतीय जनता पक्षावर पाचवेळा विश्वास दाखवला होता. कार्यकर्त्यांची फळी आपल्या पाठीशी उभी राहिली, त्यातूनच हा विजय साकारला असे त्यांनी सांगितले.

विकासकामे चालूच राहतील : पर्रीकर
पणजी पोटनिवडणुकीतील भाजपचा विजय हा केवळ पक्षासाठीच नव्हे, तर आपल्यासाठीही वैयक्तिक आनंददायक ठरला असून पक्ष यापुढेही पणजी मतदारसंघातील आपली अपूर्ण राहिलेली विकासकामे सुरू ठेवील, अशी प्रतिक्रिया संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यानी काल पणजी पोटनिवडणुकीच्या निकालानंतर नवी दिल्लीत व्यक्त केली. पणजीच्या पोटनिवडणुकीतील विजय हा भाजपचा विजय नसून जनतेचा विजय आहे असे स्पष्ट करून या विजयाबद्दल त्यांनी पणजीवासियांचे अभिनंदन केले.

हा जनतेचा विजय : मुख्यमंत्री
पणजी पोटनिवडणुकीत भाजपला जो विजय मिळाला आहे, तो गोव्यातील जनतेचा विजय असून आपण त्यासाठी जनतेचे अभिनंदन करीत असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. हा विजय अपेक्षित असाच असल्याचे ते म्हणाले. भाजपने गोव्यात केलेले काम पाहूनच जनतेने हा कौल दिला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. भाजपचे संख्याबळ पणजीतील मतदारांनी पुन्हा २१ करावे, असे आवाहन पार्सेकर यांनी पणजीतील प्रचारसभेत केले होते.
जनता व आमदाराचे अभिनंदन : फुर्तादो
पणजी मतदारसंघातील मतदारांचे व भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांचे आपण अभिनंदन करीत असल्याचे पराभूत उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांनी सांगितले. या पलीकडे आपल्याला काहीही बोलायचे नसून आपल्या पराभवाबद्दल कोणाला दोषही द्यायचा नाही, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. बाबूश मोन्सेर्रात यांनी आपल्या विरोधात केलेल्या वक्तव्यांवर तसेच आपल्या विरोधात बजावलेल्या विरोधी भूमिकेबद्दल भाष्य करायचे त्यांनी टाळले.

सिद्धार्थ कुंकळकर : कार्यकर्ता ते आमदारकीचा प्रवास
सिद्धार्थ कुंकळकर यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडल्याने एका सामान्य कार्यकर्त्याचा हा कार्यकर्ता ते आमदार असा प्रवास भारतीय लोकशाहीची ताकद दाखवून गेला आहे. सिद्धार्थ कुंकळकर हे मनोहर पर्रीकर यांच्या सहवासात आले तेव्हापासून पर्रीकरांच्या प्रचारात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. ज्या पणजी मतदारसंघामध्ये भाजपाला अडीचशे मते मिळायची, तेथे मनोहर पर्रीकर यांचे आगमन झाल्यानंतर हीच मते चार हजारांच्या पुढे गेली. पर्रीकरांच्या वाढत्या प्रभावाबरोबरच सिद्धार्थ यांची राजकीय कारकीर्दही बहरत गेली.
पर्रीकर यांचे सहायक म्हणून ते काम पाहू लागल्यापासून संपूर्ण गोव्यातील कार्यकर्त्यांना ते परिचित झाले. पर्रीकर यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांनी पक्षाने सोपवलेली विविध जबाबदारी तर पेललीच, शिवाय पर्रीकर मुख्यमंत्री असतानाच्या काळात जनता आणि मुख्यमंत्री यांच्यातील दुवा म्हणूनही काम पाहिले.
पर्रीकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात पाचारण केले आणि गोव्यातील सत्ता समिकरणे एका रात्रीत बदलली. पर्रीकर यांच्या जागी पणजीत कोण या प्रश्नाची चर्चेची गुर्‍हाळे रंगली असतानाच स्वतः पर्रीकर यांनी आपल्याच एका विश्वासू कार्यकर्त्याच्या गळ्यात उमेदवारी टाकण्याचा निर्धार केला आणि तो प्रत्यक्षातही उतरवला. खरे तर पणजीच्या या उमेदवारीसाठी बरीच मंडळी उत्सुक होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजू सुकेरकर यांच्यापासून ते अगदी मांगीरिश पै रायकर यांच्यापर्यंत अनेकांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती. परंतु सिद्धार्थ कुंकळकर यांचा मितभाषी स्वभाव, त्यांची स्वच्छ छबी, जनतेशी संपर्क व मुख्य म्हणजे पणजीच्या कार्यकर्त्यांशी असलेली त्यांची बांधिलकी व यापूर्वीच्या निवडणुकांचा अनुभव या सगळ्या बाबी लक्षात घेऊन भाजपने उमेदवारी सिद्धार्थ यांनाच देणे पसंत केले. पक्षाचा व मनोहर पर्रीकर यांचा हा विश्वास सार्थ ठरवत सिद्धार्थ यांनी पणजीची ही जागा पर्रीकरांसारख्याच दिमाखात खेचून आणली आहे. पक्षाचे संख्याबळ पुन्हा २१ करण्यात तर त्यांनी योगदान दिले आहेच, शिवाय संरक्षणमंत्रीपदावर गेलेल्या पर्रीकरांची प्रतिष्ठा राखण्याचे कामही केले आहे.
पणजी फर्स्ट
आपल्या जाहीरनाम्यात आपले प्राधान्य नेहमीच पणजी शहराच्या विकासाला असेल अशी ग्वाही सिद्धार्थ कुंकळकर यांनी दिली होती. ‘पणजी फर्स्ट’चे हे आश्वासन आता त्यांना प्रत्यक्षात उतरवावे लागेल.
या जाहीरनाम्यात त्यांनी दिलेली ठळक आश्वासने अशी आहेत :
वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी नवीन वाहतूक आराखडा
पाटो – नेवगीनगर पूल
शहरांतर्गत फिरत्या बससेवेचे जाळे
कांपाल येथे अत्याधुनिक फुटबॉल मैदान
मळा तलाव विकास प्रकल्पाची पूर्तता
रायबंदर येथे सुसज्ज बाजार प्रकल्प
पणजी मार्केटच्या तिसर्‍या टप्प्याचे काम
शहरात नवीन जलवाहिन्या
पणजीच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा
रायबंदर व पाटो प्लाझा येथे सांडपाणी निचरा प्रकल्प
पाटो प्लाझा येथील कचरा प्रकल्पाचे स्थलांतर
नागरिकांसाठी हेल्पलाईन
महत्त्वाच्या ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट
पणजीचे गार्डन सिटीत रूपांतर
तीन केंद्रांत फुर्तादोंना आघाडी
एकूण ३० मतदान केंद्रांत घेण्यात आलेल्या या निवडणुकीत ३० पैकी केवळ तीन मतदान केंद्रांवरच सुरेंद्र फुर्तादो मतांची आघाडी घेऊ शकले. केंद्र क्र. २६ व २७ या कांपाल येथील टी. बी. कुन्हा उच्च माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रांमध्ये फुर्तादो यांना सिद्धार्थ कुंकळकर यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली. फुर्तादो यांच्या प्रभागातील मतदारांनी त्यांना साथ दिल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले. केंद्र क्र. २६ वर सुरेंद्र फुर्तादो यांना ३४८, तर सिद्धार्थ यांना १९० मते मिळाली. केंद्र क्र. २७ वर फुर्तादो यांना ३३५, तर सिद्धार्थ यांना २८३ मते मिळाली. मळ्यातील मेरी इमॅक्युलेट शाळा इमारतीतील मतदान केंद्रात फुर्तादो यांना २६८, तर सिद्धार्थ यांना १३६ मते मिळाली. ही तीन केंद्रे सोडल्यास अन्य सर्व मतदान केंद्रांवर सिद्धार्थ कुंकळकर यांनी मतांची भरभक्कम आघाडी मिळवल्याचे दिसून आले. मतदान केंद्र क्र. १, २, ६, ९, १६, १८ व २१ मध्ये कॉंग्रेस उमेदवाराला केवळ दोन अंकी मतांवर समाधान मानावे लागले.