पणजी स्मार्ट सिटीअंतर्गत हिंदू फार्मसीजवळील एका जुन्या इमारतीलगत पदपथ सुशोभीकरणाच्या कामासाठी खोदकाम करताना एक पुरातन मूर्ती काल आढळून आली. पणजी स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामांबरोबर रस्ता व पदपथ सुशोभिकरणाचे काम केले जात आहे. चर्च चौकाजवळील हिंदू फार्मसीच्या परिसरात रस्ता व पदपथ तयार करण्याचे काम सुरू आहे. एका जुन्या इमारतीजवळ पदपथासाठी खोदकाम करताना ही पुरातन मूर्ती आढळून आली. पुरातन मूर्ती सापडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. ही जुनी मूर्ती कुणाची याबाबत अजून काहीच स्पष्ट झालेले नाही. सदर मूर्तीला खोदकामामुळे धक्का बसल्याने दोन भाग झाले आहेत.