तांबडीमाती-सांतइनेज पणजी येथील व्यावसायिक शकील जमादार यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी पणजी पोलिसांनी सहा ते सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री शकील जमादार या व्यावसायिकावर सात अज्ञात बुरखाधारी हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला केला.
यासंबंधी जमादार यांनी पणजी पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली आहे. जमादार हे मंगळवार १८ रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास आपले काम संपल्यानंतर घरी आले. त्याच वेळी घराजवळ दुचाकी पार्क करताना सात अज्ञात बुरखाधारी हल्लेखोरांनी त्यांच्यावर हॉकी स्टिक आणि तलवारीने हल्ला केला. त्यांच्या डाव्या हातावर तलवारीने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याना कुटुंबीयांनी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल केले तसेच या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.