पाटो ते मळा पणजी दरम्यान रूआ द ओरेम खाडीवरील नवीन पुलाच्या जवळील मुख्य जलवाहिनी स्थलांतरीत करण्याच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवावा लागल्याने पणजी परिसरातील नागरिकांना गेले दोन दिवस पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले.
दरम्यान, जलवाहिनीच्या स्थालांतराचे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळपासून पाणी पुरवठ्याला सुरूवात करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्ता दिलीप ढवळीकर यांनी दिली.
पाटो ते मळा दरम्याम रूआ द ओरम खाडीवर नवीन चौपदरी पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पूलाच्या एका बाजूच्या भागाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या बांधकाम क्षेत्रात मुख्य जलवाहिनी येत आहे. सदर जलवाहिनी बदलण्याचे काम ३ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आले. पाटो आणि मळा या दोन ठिकामी जलवाहिनी जोडण्यात आली आहे. जलवाहिनी जोडण्यात आलेल्या ठिकाणी सिमेंट क्रॉक्रीटचा नवीन थर घातला आहे. त्यामुळे सुरूवातीला कमी दाबाने पाण्याचा पुरवठा केला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
या जलवाहिनी स्थलांतरीत कामामुळे पणजी, ताळगाव, मेरशी, सांताक्रुज, बांबोळी व इतर भागातील पाणी पुरवठा बंद ठेवावा लागला होता. रविवारी संध्याकाळी आणि सोमवारी सकाळी पाण्याचा पुरवठा न झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला. पाणी पुरवठा खात्यातर्फे काही ठिकाणी टँकरद्व्रारे पाणी पुरवठा करण्यात आला. सोमवारी रात्री उशिरा पाणी पुरवठ्याला सुरूवात होईल, असे सूत्रांनी सांगितले.