दोन दुकानांचे नुकसान
जुन्या सचिवालयाकडील पोर्तुगीजकालीन इमारत ‘क्लब नॅशनल’च्या छपराचा काही भाग काल दुपारी कोसळला. यात सुदैवाने कोणाला इजा झाली नाही, मात्र इमारतीत असलेल्या दोन दुकानांचे नुकसान झाले.
हा भाग कोसळला तेव्हा क्लब नॅशनल इमारतीचे दार उघडे होते, मात्र आत कोणी नव्हते. शिवाय रविवार असल्याने इमारतीकडे गर्दी नव्हती. छप्पर कोसळल्याचे कळल्यानंतर शेजारील घरातील महिलेने इमारतीतील ग्रँड दिल्ली दुकानाच्या मालकास दूरध्वनीवरून माहिती दिली. त्याने अग्नीशामक दलास कळवले. अग्नीशामक दलाने अत्याधुनिक शिडीच्या सहाय्याने इमारतीवरून पाहणी केली असता सुमारे चार मीटर भाग कोसळल्याचे तसेच इमारतीच्या आतील भिंत कोसळल्याचे आढळून आले. भिंत कोसळल्याने दुकानातील सोन्याचे, चांदीचे दागिने तसेच तेथे असलेल्या बारमधील दारुचे तसेच अन्य वस्तूंचे नुकसान झाल्याचे आढळून आले. पावसात आणखी नुकसान होऊ नये यासाठी छप्पत ताडपत्रीने झाकण्यात आल्याचे अग्नीशामक दलाने सांगितल. दरम्यान, ही इमारत फार जुनी असून चिंताजनक स्थितीत आहे. इमारतीला लाकडी माडी आहे.