>> १८ जून आणि आत्माराम बोरकर रस्त्यांचा समावेश
>> महापौर उदय मडकईकर यांची माहिती
पणजी महानगरपालिका क्षेत्रातील बेशिस्त पार्किंगमध्ये शिस्त आणण्यासाठी प्रायोगिक तत्त्वांवर दोन प्रमुख मार्गांवर येत्या १ ऑक्टोबर पासून पे पार्किंग योजना राबविण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या पे पार्किंगच्या प्रस्तावाला नगरपालिका संचालकांकडून मान्यता मिळाल्यानंतर निविदा जारी केली जाणार आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दै. नवप्रभाला दिलेल्या खास मुलाखतीत काल केली.
महानगरपालिका मंडळाने राजधानीतील आत्माराम बोरकर रस्ता आणि १८ जून रस्ता या दोन प्रमुख मार्गांवर पे पार्किंग योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पे पार्किंगसाठी शुल्क सुध्दा निश्चित केले आहे. नगरपालिका प्रशासनाकडून या प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी फाईल पाठविण्यात आली होती. परंतु, महानगरपालिकेच्या बैठकीच्या इतिवृत्तात शुल्काबाबत माहिती देताना टंकलेखनाची चूक झाली. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने सदर प्रस्ताव परत पाठविला आहे. येत्या २७ ऑगस्ट रोजी होणार्या महानगरपालिकेच्या मंडळाच्या बैठकीत पे पार्किंगच्या प्रस्तावात झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाकडे पुन्हा प्रस्तावाची फाईल मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मडकईकर यांनी दिली.
खड्डे बुजविणे युद्धपातळीवर
महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या शनिवार आणि रविवारी विविध भागातील खड्डे बुजविण्यात आले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी सिमेंटचा वापर केला जात आहे. सिमेंट लवकर घट्ट व्हावे म्हणून रसायनाचा वापर केला जात आहे. गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. नागरिकांकडून खड्ड्यांची माहिती मिळविण्यासाठी खास व्हॉटसअप क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.
डिसेंबरपर्यंत रस्ते हॉटमिक्स
पणजी शहरातील सर्व रस्त्यांचे डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण केले जाणार आहे. आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाला रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचे प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली आहे. कॅसिनोमध्ये काम करणार्या साधारण ३०० कर्मचार्यांकडून रस्त्यावर पार्क करण्यात दुचाकी वाहनांसाठी पाटो, पणजी येथील जीटीडीसीच्या पार्किंग प्लाझामध्ये तळमजल्यावरील जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही मडकईकर यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या मार्केटमधील व्यावसायिकांच्या प्रलंबित प्रश्नावर मंडळाच्या आगामी बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. व्यावसायिकांना लीव्ह अँड लायन्सन्स करारावर दुकाने देण्यात येणार आहे. मार्केटमधील व्यावसायिकांकडून प्रलंबित सर्व शुल्क वसूल केले जाणार आहेत. प्रलंबित शुल्काचा भरणा करण्यासाठी व्यावसायिकांना तीन ते चार हप्त्यांची सोय उपलब्ध केली जाऊ शकते, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.
दुचाकींना वगळणार
पे पार्किंग निविदेसाठी कमीत कमी ४० लाख रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच निवडण्यात येणार्या ठेकेदाराला २५ टक्के अनामत रक्कम आणि दोन महिन्यांचे शुल्क आगाऊ भरावे लागणार आहे. पे पार्किंगमध्ये दुचाकी वाहन चालकांकडून शुल्क आकारले जाणार नाही. शहरातील वाढत्या चार चाकी वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. शहरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. पे पार्किंग योजनेमुळे या समस्येवर तोडगा निघू शकतो, असेही मडकईकर यांनी सांगितले.