राजधानी पणजीतील दुचाकी, चार चाकी वाहनचालक गेल्या काही दिवसांपासून शहरात कोणत्याही वेळी होणार्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त बनले आहेत. मात्र या कोंडीपासून वाहन चालकांना दिवसा देण्याबाबत वाहतूक पोलिसांकडे कोणतीही नियोजनबद्धता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेश चतुर्थी ऐन तोंडावर येत असताना पणजीतील वाहनचालकांची डोकेदुखी वाढणार आहे. यावर नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अष्टमीची फेरी नुकतीच मांडवी नदी काठावर सुरु झाल्याने कोणत्याही वेळी वाहतूक कोंडी होत असल्याने दिसून येत आहे. त्याआधी डॉन बॉस्को हायस्कूलमधील काही दिवसांच्या प्रदर्शनामुळे संपूर्ण बाजार परिसरात कोंडी होत होती. सांतइनेज भागात काकुलो आयलंड व त्या पुढील विवांता हॉटेलनजीकच्या जंक्शनवर तर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब ठरली आहे.
मांडवी काठावरील फेरीमुळे मासळी मार्केटसमोरील भागात आधीच होणार्या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. प्रमुख मार्ग असूनही बांदोडकर मार्गालगत वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
काकुलो आयलंड येथे एकेरी मार्ग असलेल्या जंक्शनवर बाजूला वाहने उभी केली जातात. येथे ताळगाव, आल्तिनो, भाटले येथून मोठ्या संख्येने येणार्या वाहनांमुळे कोंडी होते. अशीच कोंडी विवांता हॉटेलजवळील जंक्शन ते सांतइनेज चर्च या भागात वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक पोलीस कधी असले तर ते फक्त जंक्शनवरच असतात. अन्यत्र कोठेही वाहतूक पोलिसांचे अस्तित्व जाणवत नाही. म्हणूनच वाहतूक पोलिसांच्या संख्येत वाढ करावी व त्यांना संभाव्य वाहतूक कोंडीच्या ठिकाणी तैनात करावे अशी मागणी आहे.