पणजीतील औषधालये

0
61
  • शरत्चंद्र देशप्रभू

या फार्मसीत त्याकाळी ‘पोसांव’ म्हणजे तयार केलेले औषध मिळत असे. डॉक्टरांनी गिचमीड अक्षरांत लिहिलेले विस्तृत प्रिस्क्रिप्शन पांढऱ्याशुभ्र ॲप्रन घातलेल्या औषधी चेहऱ्याच्या कंपाऊंडरकडे दिले की गिऱ्हाइकांची परिस्थिती विटेवर उभ्या राहिलेल्या विठ्ठलासारखी असायची.

अश्मयुगानंतर आलेल्या काळात लक्षणीय परिवर्तन झाले. ‘अन्न-वस्त्र-निवारा’ या मानवाच्या प्राथमिक गरजा झाल्या. आजच्या अतिप्रगत काळात आणखीन एक मूलभूत गरज याला आपोआप जोडली गेली, ती म्हणजे औषधे. आजचा पुढारलेला मानव औषधयुक्त जीवन कंठत आहे. पूर्वीचा मानव औषधमुक्त असल्याचे पण आपण ठामपणे सांगू शकत नाही. झाडपाल्याची औषधे, मुळ्या, तसेच हरीण, हत्ती यांसारख्या प्राण्यांचे औषधी गुण असलेले अवयव पण काही कुटुंबांच्या जुन्या फडताळात आढळतात. मुख्यतः वाजीकरणासाठी यांचा सर्रास वापर केला जात असे. वैद्यकीय ज्ञान व सुविधांचा अभाव हे पण औषधांचा प्रसार न होण्याचे एक प्रमुख कारण असू शकेल. आज समाजातील बहुतेक लोक औषधांवर कमी-अधिक प्रमाणात अवलंबून असल्याचे प्रतीत होत आहे. युवावर्ग पण औषधांच्या जंजाळापासून अलिप्त राहणे दुष्कर होत चालले आहे.

आजच्या पार्श्वभूमीवर मला आठवते साठ-सत्तर वर्षांपूर्वीची पणजीतील तुरळक वस्ती आणि मोजकी औषधालये. औषधांची गरज थंडीताप अथवा साथीच्या रोगांसाठी. आजच्यासारखी आजन्म औषधांचा अंकित होण्यासारखी परिस्थिती नव्हती. रक्तशर्करा, रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या गोळ्या तर अव्याहतपणे घ्याव्या लागतात. प्रवासात औषधांचा भलामोठा ‘पाउच’ सोबतीला असतो. पणजीतील त्याकाळच्या औषधालयांना व्यापारी स्वरूप आले नव्हते. औषधविक्रेते अन्‌‍ रोगी-गिऱ्हाइकांमध्ये आपुलकीचे, जिव्हाळ्याचे बंध निर्माण होत. विशिष्ट व्यक्ती विशिष्ट औषधालयातच जाणार. औषधी आस्थापनांतील त्याकाळची आस्थापने म्हणजे ‘कॉझ्मी मातियश मिनेझिश’, ‘मिनिझिश ॲण्ड सिया’, ‘कामिल मिनेझिश’ आणि मडगावच्या कारेंची ‘फार्मासिय सालसेती.’ बहुतांश फार्मसी या जुन्या बसस्टॅण्डच्या आसपास होत्या, अजूनही आहेत. या फार्मसीत त्याकाळी ‘पोसांव’ म्हणजे तयार केलेले औषध मिळत असे. डॉक्टरांनी गिचमीड अक्षरांत लिहिलेले विस्तृत प्रिस्क्रिप्शन पांढऱ्याशुभ्र ॲप्रन घातलेल्या औषधी चेहऱ्याच्या कंपाऊंडरकडे दिले की गिऱ्हाइकांची परिस्थिती विटेवर उभ्या राहिलेल्या विठ्ठलासारखी असायची. मख्ख चेहऱ्याचा कंपाऊंडर फार्मसीच्या आतील कळकट, अंधाऱ्या जागेत जाणार अन्‌‍ रसायन करण्यात दंग होणार. इथे पण ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ हा पायंडा कटाक्षाने पाळला जात असे. त्यामुळे अत्यावस्थ रुग्ण घरी, अन्‌‍ नातेवाइकाची कंपाऊंडरची प्रतीक्षा करण्यात होणारी घालमेल अजूनही आठवते. कंपाऊंडरची पण कराव्या लागणाऱ्या क्लिष्ट रसायनामुळे गोची होत असे.

मोहेंजोदारो अन्‌‍ हराप्पा लिपीला मागे टाकणाऱ्या डॉक्टरांच्या अगम्य अक्षरांची फोड करून, विविध घटकांचे काटेकोरपणे वजनमाप करून ते मिश्रण घोटायचे म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे! त्यासाठी कमालीची एकाग्रता, समरसता अन्‌‍ व्यावसायिक निष्ठेची आवश्यकता असते. बहुतेक कंपाऊंडर या अग्निदिव्यातून तावून आलेले. तयार केलेले रसायन बाटलीत ओतून त्यात ‘भाग’चा तक्ता चिकटवला की कंपाऊंडरचे काम संपले. कंपाऊंडर सुट्टीवर असला तर मालक पण यातला तज्ज्ञ. तो स्वतःच रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून पांढरा डगला चढवून आणीबाणीत कंपाऊंडरची भूमिका कसोशीने वठवत असे. याप्रसंगी शुष्क चेहऱ्यामागील मानवी चेहरा आपत्कालीन गरजा भागविण्यास तत्पर असे. औषध तयार करणारा कंपाऊंडर म्हणजे आम्हा मुलांना शोधात मग्न असलेला प्रतिवैज्ञानिकच वाटे.

काही औषधालयांत जिवंत जळवा पण रक्तमोक्षणासाठी ठेवल्या जात. परंतु यांची विक्री कठोर निर्बंधात होत असे. आजच्या पिढीचा फार्मसीत जिवंत जळवा ठेवत यावर विश्वास बसणार नाही. कारण आता वैद्यकीय विश्वात फार मोठे बदल झाले आहेत. अद्ययावत उपकरणे आली आहेत. इलाजाच्या प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले आहेत. त्याकाळी ‘हिंदू फार्मसी’ हे एक नावाजलेले ॲलोपॅथिक अन्‌‍ आयुर्वेदिक औषधे देणारे आस्थापन. यात तयार केलेले औषध द्रवरूपाने तसेच पावडरच्या स्वरूपात मिळत असे. उग्र दर्प असलेल्या पावडरच्या पुड्या अलगद मधात सोडायच्या. पावडर मधात पूर्णपणे विरल्यावर अनामिकेच्या सहाय्याने ते चाटण चाटायचे. कडू, गोड, तिखट, तुरट अशी मिश्र चव असलेले ते मधाळ रसायन म्हणजे आम्हा मुलांची चंगळच. इथे विविध औषधी वनस्पती असलेले कडू औषध पण मिळत असे. त्याचा काढा करून आम्हाला रविवारच्या सुट्टीत पाजत. मग कडवट चव जिभेवर संध्याकाळ येईपर्यंत रेंगाळत असे. सर्दी-पडशावरील ‘कसाय’ची पुडी पण या फार्मसीत मिळत असे. अजूनही ही प्रथा चालू आहे. वैद्यशिरोमणी स्वर्गीय दादा वैद्यांनी स्थापन केलेले हे औषधालय अजूनही विशुद्ध हेतूने रुग्णांसाठी फार चांगली सेवा देत आहे. आमच्या लहानपणी या आस्थापनाचे एक भागीदार स्व. श्रीपती वैद्य आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वामुळे अजून आठवतात. पांढराशुभ्र ॲप्रन परिधान केलेले, तेजस्वी, गोरेपान श्रीपती वैद्य म्हणजे निष्काम कर्मयोगी. यांच्या तोंडून कधी एक शब्द फुटलेला मी ऐकला नाही. संवाद साधणार तो संयत देहबोलीतून, आश्वासक तत्पर सेवेतून. त्याकाळी आयुर्वेदिक उत्पादने मिळण्याचे पणजीतील एकमेव औषधालय म्हणजे ‘हिंदू फार्मसी’. आजही ही परंपरा ‘हिंदू फार्मसी’ आधुनिक व्यावसायिकतेची जोड देऊन चालवते आहे.

पणजी महानगरपालिकेच्या विरुद्ध दिशेला पण एक औषधालय जुन्या वाड्यात कार्यरत आहे. ते म्हणजे ‘फार्मासिय अनंत.’ पोर्तुगीजकालीन या औषधालयाचे त्यावेळचे मालक कनवाळू वृत्तीचे. मध्यान्ह रात्री पण गरजूने दार ठोठावले तरी झोपमोड करून सेवा देणार. डॉन बॉस्कोजवळ पण एक छोटेसे औषधालय होते- ‘फार्मासिय आझावेदू.’ मळ्यात पण भांडारी हॉस्पिटलच्या परिसरात एक कॅथलिक गृहस्थ औषधालय चालवत. हॉस्पिटलातील रुग्णांना याचा लाभ होत असे.

गोवा मुक्तीनंतर लोकसंख्या वाढली, धंदे वाढले, इस्पितळे, दवाखाने वाढले. याला तोंड देण्यासाठी नवनवीन औषधालये पणजीत उघडली गेली. फेरीबोटीजवळ कै. भोसले यांनी ‘बाबनी फार्मसी’ हे आस्थापन वर्षा बुक स्टॉलच्या शेजारी उघडले. मगो- काँग्रेसच्या राजवटीत जेव्हा जनसंघ, भाजपाचे अस्तित्व पण नव्हते त्यावेळी कै. भोसले या एकाडी शिलेदाराने आपल्या परीने भाजपाची पताका आपल्यापुरती तरी फडकवत ठेवली. प्रतिरोध असो किंवा प्रतिसाद. मार्केट परिसरात ‘मोयो मेडिको’, ‘चंदू फार्मसी’, ‘कमल ड्रगिस्ट’ अशा फार्मसी आल्या. सांतइनेज भागात वागळे, तांबा यांनी औषधालये उघडली. जसजसा पणजीचा विस्तार होऊ लागला तशी टोंक, करंझाळे, भाटले, दोनापावला येथे औषधालये कार्यरत झाली. शिवाय पूर्वीच्या तळावलीकर हॉस्पिटलच्या समोर पण एक फार्मसी उघडली गेली. काही औषधालयांत तर चोरीचा माल विकला जातोय अशी वदंता पसरली होती. तशीच बनावट औषधांची विक्री होत असल्याचे बोलले जात असे. परंतु काही फार्मसी मालक गरजूंना उधारीवर किंवा कमी किमतीत औषधे देत. त्यावेळी माहोलच वेगळा होता. आजच्यासारखी पाच ते वीस टक्के डिस्काऊंट देण्याची जीवघेणी स्पर्धा अवतरली नव्हती.

घाऊक किमतीची ‘जेनेरीक’ औषधे पण आता पणजीत मिळतात. याचा फार मोठा फायदा गोरगरिबांना होतो. ब्रॅण्डेड औषधे घेणे यांच्या कुवतीबाहेर. यामुळे प्रतिजैविके पण हे लोक आर्थिक क्षमतेवर घेणार, डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनप्रमाणे नाही. दुष्परिणामांची पर्वा नाही. आता पणजीत मोठमोठी आलिशान औषधालये उघडली गेली आहेत, चोवीस तास सेवा देणारी. पूर्वी सरकारला रोटेशन पद्धतीने औषधालये रविवारी अन्‌‍ रात्री उघडी ठेवायचे आदेश द्यावे लागत. आता औषधालये अन्‌‍ उपाहारगृहे पणजीत विपुल प्रमाणात कार्यरत आहेत. श्वानासाठी मुख्य औषधालयात एक छोटासा विभाग असायचा. आता यांच्या खाद्य व औषधांसाठी स्वतंत्र औषधालये उघडली, जेथे दररोज राखो रुपयांचे व्यवहार होतात. आता श्वानांना अतिमहनीय व्यक्तीची वागणूक मिळते आहे. त्यांच्या खाद्यावर, औषधांवर, पट्ट्यावर, डॉक्टरी इलाजावर अमाप पैसा खर्च केला जात आहे.
आज अद्ययावत वैद्यकीय सेवा अन्‌‍ फार्मसीमुळे ‘घरचा वैद्य’ ही संकल्पनाच इतिहासजमा झाली आहे. एकत्र कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आपल्या पोतडीतून अफलातून घरगुती औषधे काढून प्राथमिक उपचार करायचे. कारण ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा किंवा औषधालये अस्तित्वातच नव्हती. काही का असेना, औषधांच्या उपलब्धतेमुळे आयुष्यमानात गुणात्मक फरक पडलेला आहे हे निश्चित!