पणजीच्या महापौरपदासाठी येत्या मार्च महिन्यात निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यमान महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची बबन भगत यांनी घेतलेली मुलाखत.
प्रश्न : येत्या मार्च महिन्यात पणजीच्या महापौरपदासाठी परत एकदा निवडणूक होणार आहे. तुम्ही यावेळी पायउतार होणार की पुन्हा एकदा महापौरपदासाठी अर्ज भरणार?
उत्तर : आमचे नेते बाबुश मोन्सेर्रात यांनी पणजी महापालिकेच्या निवडणुकीनंतरच सुरेंद्र फुर्तादो हे येत्या पाच वर्षांसाठी पणजीचे महापौर असतील अशी घोषणा केली होती. त्यामुळे मी महापौरपदावरून पायउतार होण्याचा प्रश्नच येत नाही. मार्चमध्ये होणार्या महापौरपदासाठीच्या निवडीच्या वेळी मी निश्चितच अर्ज भरेन. पणजी महापालिकेतील माझ्या ३० सहकारी नगरसेवकांचाही मला पूर्ण पाठिंबा आहे. मी विकासकामे करीत असल्याने सर्व तीसही नगरसेवकांच्या मला पाठिंबा आहे.
प्रश्न : पुन्हा महापौरपदी निवड झाल्यास पुढील दोन वर्षांच्या काळासाठी तुमची काय योजना आहे.
उत्तर : पणजी महापालिकेची नवी सहामजली इमारत बांधण्यासाठीची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. सहा कोटी रु. खर्चून ही इमारत उभारण्यात येणार आहे. खरे म्हणजे गेल्या २६ जानेवारी रोजीच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते या इमारतीची पायाभरणी करण्याची आमची योजना होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ते होऊ शकले नाही. आता आम्ही नव्या मूहूर्ताच्या प्रतीक्षेत आहोत. ही नवी सहा मजली इमारत उभी करणे हे माझे स्वप्न असून ते साकार करण्यासाठी पुढील काळात वावरणार आहे. ही इमारत उभी राहिल्यानंतर महापालिकेचा महसूलही वाढणार असून महापालिका स्वयंपूर्ण होण्यासही मदत होणार आहे.
प्रश्न : गेल्या दोन वर्षांच्या काळात तुम्ही केलेल्या कामाविषयी सांगा.
उत्तर : गेल्या दोन वर्षांच्या काळात मी पणजी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. नुकतेच दोन बँकांना उद्योगांची सामाजिक जबाबदारी या योजनेखाली पणजीतील १८ जून रोड व महात्मा गांधी रोड हे दोन रस्ते स्वच्छ करण्यासाठीची जबाबदारी घेण्यास लावले. सीएसआरखाली ११ ट्रक मिळवले. ह्याच योजनेखाली ४ कॅसिनो कंपन्यांकडून १ कोटी रु. मिळवले. त्यातील ५५ लाख रु. खर्चून झाडांच्या फांद्या व खोडांचा भुगा करणारे जलचर यंत्र आणले. तर उर्वरीत निधी गुरांच्या निवार्यासाठीची जी सोय करण्यात आलेली आहे त्यावर खर्च केला.
जीसूडाकडून महापालिकेला ५ कोटी रु. मिळालेले असून ह्या पैशातून हिंदू स्मशानभूमी, मुस्लिमांचे कब्रस्तान, ख्रिस्ती दफनभूमी यांच्या ठिकाणी अधिक सुविधा निर्मिती करण्याचा विचार आहे. कुडका येथे १५०० चौ. मीटर जमिनीत कुत्र्यांसाठीही निवार्याची सोय करण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हल्लीच महापालिकेने लोकांना कचर्यासाठी घरोघरी देण्यासाठी २० हजार कचरा कुंड्या आणल्या होत्या. लोकांना तसेच दुकानदारांना त्या देण्यात आल्या. शिवाय कचरा गोळा करण्यासाठीच्या १ हजार ट्रॉलीही आणण्यात आल्या. येत्या २२ मार्च रोजी पणजीला राजधानीचा दर्जा मिळाला त्या घटनेला १७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. हा दिवस थाटामाटात साजरा करण्याची पणजी महापालिकेची इच्छा आहे.