म्हादई अभयारण्यातील चार वाघांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर वनखात्याने आगामी पक्षी महोत्सव लांबणीवर टाकावा, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई यांनी पत्रकार परिषदेत काल केली.
वनखात्याच्या अनास्थेमुळे चार वाघांची हत्या करण्यात आली. म्हादई अभयारण्यातील वाघांचे संरक्षण करण्यात वनखाते अपयशी ठरल्याचा आरोप प्रभुदेसाई यांनी केला.
अभयारण्यात वाघ, वाघीण व बछडे असल्याचे वनखात्याने लावलेल्या कॅमेर्यामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वनखात्याने वाघांच्या रक्षणार्थ योग्य उपाययोजना हाती घेण्याची गरज होती. चार वाघांच्या हत्येमुळे गोव्याचे नाव देश आणि जागतिक पातळीवर बदनाम झाले आहे. अभयारण्यातील वाघाने गायीची शिकार केल्याची तक्रार गायीच्या मालकाने केल्यानंतर वनखात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्वरित कृती करण्याची गरज होती. परंतु, या तक्रारीची वेळीच दखल न घेतल्याने वाघावर विष प्रयोग करण्यात आल्याचा दावा प्रभुदेसाई यांनी केला.
कर्नाटक वनखात्याला पाळीव जनावरांच्या शिकारीसंबंधी तक्रार प्राप्त झाल्यास वनखात्याकडून त्वरित चौकशी करून मालकाला नुकसानभरपाई दिली जाते, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.