तेलंगणामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पक्षांतर करावे, यासाठी कोट्यवधींची लाच देत मध्यस्थी करणार्या तिघांना पोलिसांनी अटक केली. तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) चार आमदारांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र आमदारांनीच पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली. अटकेतील तिघांकडून १५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी तेलंगणा राष्ट्र समितीने भाजपवर आरोप केले आहेत; भाजपाने सर्व आरोप फेटाळले असून, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे लक्ष विचलित करण्यासाठी घोडेबाजाराचा आरोप करत असल्याचे म्हटले आहे.
अजीजनगर येथील फार्महाऊसमध्ये बुधवारी संध्याकाळी कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर आमदारांनी पोलिसांना फोन करून आपल्याला पक्षांतरासाठी प्रलोभने दिली जात असल्याची तक्रार केली होती. पक्षांतरासाठी आपल्याला मोठी रक्कम, पदांची ऑफर दिली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सायराबादचे पोलीस प्रमुख स्टीफन रवींद्र यांनी दिली.