>> काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याकडून स्पष्ट; पक्षबदलूंना अद्दल घडवण्याची गरज
काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास पक्षांतरबंदी कायदा आणखी बळकट केला जाणार आहे, असे काँग्रेसचे मीडिया प्रभारी पवन खेरा यांनी काल काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
गोवा हे आपल्या देशाचे अनमोल रत्न आहे. गोव्याला कोळसा हाताळणी केंद्र बनवू दिले जाणार नाही. भाजप सरकार आपल्या भांडवलदार मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यातील जमिनीचे रूपांतर करत आहे. त्यांनी मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यातील मोठ्या जमिनीचे रूपांतर केले आहे. त्यांना गोव्याचा निसर्ग नष्ट करण्यापासून रोखले पाहिजे. पर्यावरण संतुलन आणि गोव्याची जैवविविधता आणि तिची ओळख यांचे काँग्रेस पक्ष संरक्षण करणार आहे, असेही खेरा यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी राज्यातील खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते अयशस्वी ठरले आहेत, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभवाची भीती वाटत आहे. म्हणून त्यांनी अधिक खोटे पसरवण्यास आणि ज्वलंत मुद्द्यांपासून लोकांचे मन वळविण्यास सुरुवात केली आहे. मोदींचा संविधान बदलण्याचा डाव असून, म्हणूनच त्यांनी 400 पारचा नारा दिला आहे, असा दावा खेरा यांनी केला.
पक्षांतर करून मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आमदारांना अद्दल घडवण्यासाठी पक्षांतरबंदी कायदा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. भाजपने आमदार आयात करून आणि विरोधकांना कमकुवत करून लोकशाहीची थट्टा चालवली आहे. पक्षांतराला प्रोत्साहन देऊन सरकार स्थापन केलेल्या राज्यांमध्ये यापुढे भाजपचे सरकार येणार नाही, असा दावाही खेरा यांनी केला.
मोदींना पुन्हा फक्त भांडवलदारांसाठी सरकार बनवायचे आहे, सर्वसामान्यांसाठी नाही. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आणि हसनचा खासदार प्रज्वल रेवण्णा हा लैंगिक छळात गुंतलेला असून, एसआयटी स्थापन झाल्यानंतर तो जर्मनीला पळून गेला आहे. पंतप्रधान मोदींना त्याच्या गुन्ह्यांची माहिती असूनही त्यांनी त्याचा प्रचार केला, असे त्यांनी सांगितले.
यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, एआयसीसी मीडिया प्रभारी हर्षद शर्मा, उपाध्यक्ष सुनील कवठणकर आणि मीडिया प्रमुख अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.
पाटकरांचा सार्दिन यांना टोला
कॉँग्रेसचे नेते फ्रान्सिस सार्दिन हे आपल्या घरात बसून दक्षिण गोवा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा प्रचार करीत आहेत, असा टोला प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना लगावला.