पक्षविरोधी कारवाया, मतविभागणीमुळे पराभूत

0
12

>> पक्षाच्या पणजीतील बैठकीत पराभूत भाजप उमेदवारांनी मांडली विविध कारणे

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांची पक्षाने काल पणजीत बैठक घेऊन त्यामागील कारणांचा ऊहापोह केला. या बैठकीत पराभूत उमेदवारांनी आपल्या पराभवाची कारणे मांडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहभाग घेतला. पक्षविरोधी कारवाया, मतविभागणी व अन्य काही कारणांमुळे पराभव झाल्याचे पराभूत उमेदवारांनी यावेळी सांगितले.

भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधात काम केल्याने पराभव पत्करावा लागला. भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केलेल्यांची माहिती केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविण्यात आली आहे, अशी माहिती डिचोली मतदारसंघातून पराभूत झालेल्या राजेश पाटणेकर यांनी दिली.
लंडनमध्ये अनिवासी भारतीयांमुळे आपला पराभव झाल्याचे सांत आंद्रेतील भाजपचे पराभूत उमेदवार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी सांगितले. त्यांनी आरजी या प्रादेशिक पक्षाला विविध मार्गातून पाठिंबा दिला. त्यामुळे आरजीचे विरेश बोरकर विजयी झाले, असे सिल्वेरा म्हणाले.

मायकल लोबो हे जादूगार आहेत. मायकल लोबो यांच्या पत्नी डिलायला लोबो यांनी तीन महिन्यापूर्वी शिवोली मतदारसंघात प्रवेश केला. लोबो यांनी जादूचा वापर केल्याने डिलायला लोबो यांनी विजय संपादन केला. तसेच शिवोली मतदारसंघात आरजीच्या उमेदवाराने घेतलेल्या तीन हजार मतांमुळे पराभव पत्करावा लागला, असे भाजपचे पराभूत उमेदवार दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले.

चर्चने भाजपला विरोध केल्याने पराभव झाल्याचे कुंकळ्ळीतील पराभूत उमेदवार क्लाफासिओ डायस यांनी सांगितले.
पक्षासाठी त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. पेडणे मतदारसंघ हा माझा मतदारसंघ. तथापि, पक्षाने केलेल्या सूचनेमुळे आपण मडगाव मतदारसंघातून निवडणूक लढविली, असे मडगाव मतदारसंघातून पराभूत झालेले बाबू आजगावकर यांनी सांगितले.
मतविभागणीमुळे पराभव झाल्याचे सांताक्रूझ मतदारसंघातून पराभूत झालेल्या टोनी फर्नांडिस यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कृती करून आपल्याच अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करणार्‍यांवर पक्षाने कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार माविन गुदिन्हो यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरोधात काम करणार्‍यानेच आपल्या विरोधात काम केल्याने मताधिक्य घटले, असा दावा गुदिन्हो यांनी केला.