>> पाच वर्षांत कमावले तब्बल ४० हजार कोटी रुपये; कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची राज्यसभेत लेखी उत्तरात माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकर्यांचे नैसर्गिक संकटांमुळे होणारे नुकसान भरुन निघावे म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली होती. १ एप्रिल २०१६ मध्ये ही योजना सुरू झाली. मात्र शेतकर्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या योजनेचा विमा कंपन्यांनाच अधिक फायदा झाला आहे. पीक विमा कंपन्यांनी गेल्या पाच वर्षांत ४० हजार कोटी रुपये कमावले आहेत.
पंतप्रधान पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या कंपन्यांनी गेल्या पाच वर्षांत ४० हजार कोटी कमावले आहेत. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी २०१६-१७ ते २०२१-२२ या पाच वर्षांतील आकडेवारी जाहीर केली. भाजप खासदार सुशीलकुमार मोदी आणि तृणमूल कॉंग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देण्यात आले. त्यामध्ये ही माहिती मिळाली आहे.
देशातील शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावतीने पीक विम्याची रक्कम विमा कंपन्यांना दिली जाते. विमा रक्कम म्हणून जमा झालेल्या १ लाख ५९ हजार १३२ कोटींपैकी १ लाख १९ हजार ३१४ कोटी रुपये शेतकर्यांना नुकसानभरपाई म्हणून देण्यात आले. ही आकडेवारी पाहिली असता शेतकर्यांऐवजी विमा कंपन्यांना या योजनेचा अधिक फायदा झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.
पीक विमा योजनेसाठी १८ कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकाकरकडून यामध्ये काही खासगी कंपन्यांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारला त्यांच्या राज्यात विमा कंपन्या निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. २०२१ -२२ साठी ४१९० रुपये प्रति हेक्टरी विमा हप्ता रक्कम निश्चित करण्यात आली होती. खरीप हंगामातील पिकासाठी शेतकर्यांना २ टक्के विमा रक्कम भरावी लागते, तर रब्बी हंगामासाठी १.५ टक्के रक्कम भरावी लागते.
२०१६-१७ या आर्थिक वर्षात ५ कोटी ८३ लाख शेतकर्यांनी या योजनेसाठी नोंदणी केल्याने २१६९७ कोटी रुपयांची विमा रक्कम जमा झाली. नुकसान भरपाईपोटी शेतकर्यांना १६८०७ कोटी रुपये देण्यात आले.
२०१७-१८ मध्ये ५ कोटी ३२ लाख लाख शेतकर्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली. विमा कंपन्यांकडे २४५९७ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली त्यापैकी त्यावर्षी शेतकर्यांना २२१४२ कोटी रुपये देण्यात आले.
२०१८-१९ मध्ये ५ कोटी ८० लाख शेतकर्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला. त्यामुळे विमा कंपन्यांकडे २९६९३ कोटी रुपये जमा झाले. त्यापैकी शेतकर्यांच्या नुकसान भरपाईच्या दाव्याचा परतावा म्हणून २८४६४ शेतकर्यांना देण्यात आले.
२०१९-२० मध्ये पीक विमा योजनेत सहभाग घेणार्या शेतकर्यांची संख्या वाढली. ६ कोटी २४ लाख शेतकर्यांनी या योजनेत सहभाग नोंदवल्याने ३२३४० कोटी रुपये विमा कंपन्यांना मिळाले त्यापैकी परतावा म्हणून शेतकर्यांना २६४१३ कोटी रुपये देण्यात आले.
२०२०-२१ या आर्थिक वर्षात ६ कोटी २३ हजार शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले. विमा कंपन्यांना यामुळे ३१८६१ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी शेतकर्यांचे १७९३१ कोटी रुपयांचे दावे मंजूर करण्यात आले.
२०२१-२२ मध्ये पीक विमा योजनेत सहभागी होणार्या शेतकर्यांची संख्या केवळ खरीप हंगामातील आहे. अनेक राज्य या योजनेतून बाहेर देखील पडली आहेत. ४ कोटी ९८ लाख शेतकर्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला. पीक विमा रक्कम म्हणून १८९४४ कोटी रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा झाली. त्यापैकी शेतकर्यांच्या नुकसानाचा परतावा म्हणून ७५५७ कोटी रुपये देण्यात आले.