परवान्याशिवाय ‘सिली सोल्स’चे बांधकाम

0
18

>> आरटीआयमधून उघड; पंचायत संचालकांकडे तक्रार

केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांच्या कन्येचे सिली सोल्स रेस्टॉरंट अँड बारचेे बांधकाम परवाना न घेताच करण्यात आल्याचे आरटीआयमधून उघड झाले आहे.

आसगाव येथील हे रेस्टॉरंट बांधकाम परवाना न घेताच बांधण्यात आले होते, अशी माहिती आता उघड झाली आहे. आसगाव पंचायतीने या रेस्टॉरंटचे बांधकाम करण्यासाठी कोणताही बांधकाम परवाना दिला नव्हता, अशी माहिती आयरिश रॉड्रिग्ज यांना माहिती हक्क कायद्या (आरटीआय)खाली मिळाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आयरिश रॉड्रिग्ज यांनी पंचायत संचालकांकडे याविषयी तक्रार नोंदविली असून, या बेकायदेशीर रेस्टॉरंटवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीद्वारे केली आहे.

या बेकायदा रेस्टॉरंटवरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्या कन्या झोईश इराणी हिने सदर रेस्टॉरंटच्या अगोदरच्या मालकाचा मृत्यू झालेला असतानाही त्याच्या नावावरच अबकारी परवान्याचे कथित बेकायदा नूतनीकरण केल्याचा आरोप आहे.