पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे काल पहाटे निधन झाले. अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना काल पहाटे ३.३० वाजता त्यांचे निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरू होते. देशातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी हे गांधीनगरमध्ये दाखल झाले.
तत्पूर्वी हिराबेन यांचे पार्थिव रुग्णालयातून मोदींच्या गांधीनगरमधील घरी आणण्यात आले. मोदींनी घरीच आईच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळेस घराबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. रुग्णवाहिकेपर्यंत पार्थिव नेताना मोदींनीच पार्थिवाला खांदा दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेमधून पार्थिव स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी नेताना मोदींनी रुग्णवाहिकेमधूनच प्रवास केला. येथून सकाळी आठच्या सुमारास हिराबेन मोदी यांची अंत्ययात्रा निघाली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी दिला.