आज मंगळवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी १० वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी दि. २४ मार्चपासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान मोदी यांनी घोषित केला होता. उद्या दि. १४ एप्रिल रोजी लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहेत. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवलेले आहे मात्र काही राज्ये अजूनही केंद्राच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. रेल्वे, विमान अशा विविध सेवा केंद्राच्या अखत्यारित असल्यामुळे पंतप्रधानांच्या आजच्या संबोधनाकडे देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
ओडिशा, पंजाब, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांनी लॉकडाऊन वाढवणार असल्याचे अगोदरच जाहीर केलेले आहे. केंद्र सरकारही सध्या सुरू असलेले २१ दिवसांचे लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवण्याची शक्यता आहे.
राज्यांनी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक त्रुटी राहत असल्यामुळेच राष्ट्रीय लॉकडाऊन २४ मार्च रोजी जाहीर करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण म्हणजेच एनडीएमएकडून हे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.