पंतप्रधानांची आज सांकवाळमध्ये प्रचारसभा

0
16

>> मोदींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष; दक्षिण गोवा पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा; एसपीजी कमांडो देखील सभास्थळी तैनात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (शनिवार दि. 27) सायंकाळी 5 वाजता मुरगाव तालुक्यातील झुआरीनगर-सांकवाळ येथे जाहीर प्रचारसभा होणार आहे. दक्षिण गोवा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपने पल्लवी धेंपो यांच्या रुपाने तर नवा चेहरा दिलाच आहे, शिवाय आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा देखील दक्षिण गोव्यातच आयोजित केली आहे. या सभेची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, दक्षिण गोवा पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा काल घेतला. याशिवाय पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नेहमी तैनात असणारे एसपीजी कमांडो देखील सभेच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. या सभेसाठी अंदाजे 50 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता असून, तशी बैठक व्यवस्था गोवा भाजपने केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सभेच्या माध्यमातून भाजपचे दोन्ही उमेदवार पल्लवी धेंपो आणि श्रीपाद नाईक यांच्या प्रचारासाठी गोवा दौऱ्यावर येत आहे. सांकवाळ बिर्ला येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता झुआरीनगर येथील बिर्ला मंदिरासमोर बिट्स पिलानी प्रांगणासमोरील खुल्या जागेत ही सभा होणार असून, गोव्यातून 50 हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे.
या सभेच्या व्यासपीठावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही हजर राहणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उत्तर गोव्याचे भाजप उमेदवार व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपो उपस्थित असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण हे या सभेचे मुख्य आकर्षण ठरणार असले तरी पक्षाचे जे. पी. नड्डा, प्रमोद सावंत आदींची यावेळी भाषणे होणार आहेत. पक्षाचे आमदार, मंत्री व अन्य पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत.
ही सभा यशस्वी करण्यासाठी मुरगाव तालुक्यातील तिन्ही आमदार अर्थात माविन गुदिन्हो, कृष्णा साळकर आणि संकल्प आमोणकर यांच्यासह कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार आंतोनियो वाझ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी काम सुरू केले आहे.
काल संध्याकाळी पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी संध्याकाळी सभास्थळी भेट देऊन पाहणी केली. सभास्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, त्याचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बिट्स पिलानी सभागृहात बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले.

काल सकाळी दक्षिण गोवा गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दक्षिण गोवा वाहतूक पोलीस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर, वास्कोचे वाहतूक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर, दाबोळी विमानतळ वाहतूक पोलीस निरीक्षक रोहन धामस्कर यांच्या उपस्थितीत वाहतूक व्यवस्था व इतर महत्वाच्या सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दाबोळी विमानतळ ते बिट्स पिलानी सभास्थळापर्यंतच्या वाहतूक व्यवस्थेविषयी आढावा घेतला. तसेच प्रत्येक नाक्यावर व्यवस्था कशी असेल, याविषयी आढावा घेतला.

सभेला येणाऱ्या लोकांसाठी बसची व्यवस्था

शनिवारी होणाऱ्या सभेसाठी मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातून लोकांना सभास्थळी नेण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात मुरगाव मतदारसंघातून 30 बसेस, वास्को मतदारसंघातून 50 बसेस, दाबोळी मतदारसंघातून 50, तर कुठ्ठाळी मतदारसंघातून 20 बसेसचा ताफा सोडला जाणार आहे. चारही मतदारसंघातून मिळून तीस हजारांहून अधिक लोक जाणार असल्याने प्रत्येक मतदारसंघात बसची व्यवस्था करताना भाजपा आमदार आणि मंत्र्यांच्या नाकीनऊ आले.