पंतप्रधानांचा 6 फेब्रुवारीला गोवा दौरा

0
18

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; बेतुल येथे ऊर्जा परिषदेचे करणार उद्घाटन; मडगावातील सार्वजनिक सभेत 4 प्रकल्पांचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येत्या दि. 6 फेब्रुवारी रोजी गोव्यात आगमन होणार असून, दक्षिण गोव्यातील बेतुल येथे आयोजित दुसऱ्या भारतीय ऊर्जा परिषदेचे उद्घाटन ते करणार आहेत. त्याचबरोबर विकसित भारत मोहिमे अंतर्गत मडगाव येथे आयोजित सार्वजनिक सभेत पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते एकूण 4 प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप गाभा समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

पंतप्रधान मोदी यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गाभा समितीची काल बैठक घेण्यात आली. या बैठकीत पंतप्रधानांच्या गोवा दौऱ्यातील कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान गोवा दौऱ्यावर येणार असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गतवर्षी बंगळुरूमध्ये झालेल्या पहिल्या भारतीय ऊर्जा परिषदेत सहभागी झाले होते. यंदाची दुसरी ऊर्जा परिषद गोव्यातील बेतुलमध्ये होणार असून, त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांच्या यंदाच्या वर्षातील हा पहिलाच गोवा दौरा असणार आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनानिमित्ताने ते गोवा दौऱ्यावर आले होते. तसेच त्यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये मोपा विमानतळ आणि आयुष इस्पितळाच्या उद्घाटनासाठी ते गोव्यात आले होते.
खासदार तथा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी देखील काल पंतप्रधानांच्या दौऱ्याविषयी माहिती दिली. भाजप गाभा समितीच्या बैठकीत पंतप्रधानांच्या 6 फेब्रुवारीच्या दौऱ्यावर चर्चा करण्यात आली. बेतुल येथे आयोजित ऊर्जा परिषदेत आणि मडगाव येथे आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान सहभागी होणार आहेत, अशी माहिती नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

गोव्यातील लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार दोन्ही जागांवर मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार आहेत. इंडिया आघाडीचा भाजपच्या मताधिक्क्यावर कोणताही परिणाम होणार नाही. उत्तर गोव्यात भाजपच्या उमेदवारांचे मताधिक्य वाढणार आहे, असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

युरी आलेमाव यांचा सरकारला टोला
गोवा विधानसभेचे आगामी अधिवेशन 2 ते 9 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. याच कालावधीत 6 फेब्रुवारीला पंतप्रधानांचा गोवा दौरा असल्याने त्यावरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकारला जोरदार टोला लगावला आहे. यापूर्वी विविध कारणास्तव भाजप सरकारने मागील काही विधानसभा अधिवेशनांचा कालावधी कमी केला होता, तोच मुद्दा पकडत आलेमाव यांनी टोला हाणला आहे. ‘घाबरलेले भाजप सरकार 6 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या गोवा भेटीचे कारण देत अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करुन विरोधकांच्या सरळ प्रश्नांना सामोरे जाण्यापासून पळवाट काढणार नाही अशी आशा बाळगतो’, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.