>> पाचव्या पराभवासह डेअरडेव्हिल्स तळालाच
किंग्स इलेव्हन पंजाबने १४३ धावांचा यशस्वी बचाव करताना काल सोमवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ४ धावांनी पराभव केला. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाला ८ बाद १३९ धावांपर्यंतच मजल मारता आली.
शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची आवश्यकता असताना ऍरोन फिंचने श्रेयस अय्यरचा सीमारेषेवर झेल घेत पंजाबचा विजय साकार केला. इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील हा २२वा सामना फिरोजशहा कोटला मैदानावर खेळविण्यात आला. कालच्या विजयासह पंजाबने ६ सामन्यांतून ५ विजय व १ पराभवासह अव्वलस्थानी झेप घेतली आहे.
तत्पूर्वी, मध्यमगती गोलंदाजांस मदत करणार्या खेळपट्टीवर दिल्लीच्या गोलंदाजांनी किफायतशीर मारा केला. यंदाच्या मोसमातील आपला पहिलाच सामना खेळणार्या अवेशने ऍरोन फिंच (२) याला स्वस्तात बाद करत दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. राहुल व अगरवाल यांनी यानंतर काही सुरेख फटके खेळत ३६ धावांची भागीदारी रचली. प्लंकेटने राहुलला अवेशकरवी झेलबाद करत पंजाबजी २ बाद ४२ अशी स्थिती केली. करुण नायरने खेळपट्टीचे स्वरुप ओळखून आक्रमक फटके खेळण्याचा मोह टाळताना संघाच्या डावाला आकार दिला. त्याने ३२ चेंडूंत ३४ धावा जमविल्या. युवराजकडून धावगतीला वेग देण्याची अपेक्षा असताना आपल्या १४ धावांसाठी त्याने १७ चेंडू खेळले. डेव्हिड मिलरने १९ चेंडूंत २६ धावांची खेळी केल्याने पंजाबला ८ बाद १४३ धावांपर्यंत पोहोचता आले.
दिल्लीने या सामन्यासाठी घाऊक बदल केले. पृथ्वी शॉ, अवेश खान, लियाम प्लंकेट, डॅनियल ख्रिस्टियन व अमित मिश्रा यांनी खेळवताना जेसन रॉय, ख्रिस मॉरिस, विजय शंकर, शहाबाज नदीम व हर्षल पटेल यांना बाहेर बसविले. तर दुसरीकडे पंजाबने जायबंदी ख्रिस गेलच्या जागी डेव्हिड मिलरला उतरवले. आज मंगळवारी मुंबई इंडियन्स व सनरायझर्स यांच्यात सामना खेळविला जाणार आहे.
धावफलक
किंग्स इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल झे. अवेश गो. प्लंकेट २३, ऍरोन फिंच झे. अय्यर गो. अवेश २, मयंक अगरवाल त्रि. गो. प्लंकेट २१, करुण नायर झे. अय्यर गो. प्लंकेट ३४, युवराज सिंग झे. पंत गो. अवेश १४, डेव्हिड मिलर झे. प्लंकेट गो. ख्रिस्टियन २६, रविचंद्रन अश्विन झे. तेवतिया गो. बोल्ट ६, अँडी टाय त्रि. गो. बोल्ट ३, बरिंदर सरन नाबाद ०, अवांतर १४, एकूण २० षटकांत ८ बाद १४३
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ३-०-२१-२, अवेश खान ४-०-३६-२, लियाम प्लंकेट ४-०-१७-३, डॅनियल ख्रिस्टियन ३-०-१७-१, अमित मिश्रा ४-०-३३-०, ग्लेन मॅक्सवेल १-०-४-०, राहुल तेवतिया १-०-६-०
दिल्ली डेअरडेव्हिल्स ः पृथ्वी शॉ त्रि. गो. राजपूत २२, गौतम गंभीर झे. फिंच गो. टाय ४, ग्लेन मॅक्सवेल झे. टाय गो. राजपूत १२, श्रेयस अय्यर झे. फिंच गो. मुजीब ५७, ऋषभ पंत त्रि. गो. मुजीब ४, डॅनियल ख्रिस्टियन धावबाद ६, राहुल तेवतिया झे. राहुल गो. टाय २४, लियाम प्लंकेट झे. नायर गो. सरन ०, अमित मिश्रा नाबाद १, अवांतर ९, एकूण २० षटकांत ८ बाद १३९
गोलंदाजी ः अंकित राजपूत ४-०-२३-२, बरिंदर सरन ४-०-४५-१, अँडी टाय ४-०-२५-२, रविचंद्रन अश्विन ४-०-१९-०, मुजीब उर रहमान ४-०-२५-२.