पंजशीर खोर्‍यात ६०० तालिबानी ठार

0
45

>> १००० जणांना अटक केल्याचा नॉर्दर्न अलायन्सचा दावा

अफगाणिस्तानचा ताबा मिळवला तरी तालिबानला अद्याप पंजशीर भाग मिळवता आलेला नाही. पंजशीर खोर्‍यात तालिबानी सैन्याला धक्का बसत आहे. पंजशीर परिसरात काल ६०० तालिबानी ठार झाले आहेत. तर, एक हजारांहून अधिक तालिबानींना अटक करण्यात आली असल्याचा दावा नॉर्दर्न अलायन्सकडून करण्यात आला आहे.

पंजशीर प्रांतावर याआधीदेखील १९९६ ते २००१ दरम्यानच्या तालिबानी राजवटीत ताबा मिळवता आला नव्हता. त्यामुळे यावेळेस पंजशीरवर ताबा मिळवण्यासाठी तालिबानकडून प्रयत्न सुरू आहेत. तालिबानने या प्रांतावर ताबा मिळवल्याचा दावा केला होता. मात्र, अमरुल्लाह सालेह यांनी हा दावा फेटाळून लावला.
दरम्यान, पंजशीरमधील संघर्षाबाबत नॉर्दर्न अलायन्स आणि तालिबानकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत आहे.

पंजशीरमध्ये जोरदार कारवाई सुरू असून खिंज आणि उनाबा जिल्ह्यांवर ताबा मिळवला असल्याचा दावा तालिबानने केला आहे. पंजशीरची राजधानी बाजारक आणि प्रांतीय राज्यपाल भवनाच्या परिसराकडे जाणार्‍या मार्गांवर भुसुरुंग असल्यामुळे कारवाईला वेळ लागत असून सातपैकी चार जिल्ह्यांवर ताबा मिळवला असल्याचा दावा तालिबानने केला आहे.

तर नॉर्दर्न अलायन्सचे नेते अहमद मसूद यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असल्याचे जाहीर केले आहे. पंजशीर तालिबानी दहशतवाद्यांविरोधात मजबुतीने उभा असल्याचे त्यांनी म्हटले.

सरकार स्थापना लांबणीवर
अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन करण्याचा निर्णय तालिबानने आठवडाभरासाठी पुढे ढकलला आहे. आंतरराष्ट्रीय समूहाची मान्यता मिळू शकेल, असे सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे, अशी माहिती प्रवक्ता झैबीउल्लाह मुजाहिद याने शनिवारी दिली.

दरम्यान, पाकिस्तानच्या आयएसआयप्रमुखांनी शनिवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलला अचानक भेट दिली. पाकिस्तानच्या दोन अधिकार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. जनरल फैज हमीद यांनी तालिबानच्या नेतृत्वाशी केलेल्या चर्चेच तपशील उपलब्ध झालेला नाही.

तालिबानच्या दोन गटात संघर्ष
तालिबानमधील दोन गटांत अफगाणिस्तानातील सत्तेमधील वाट्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात हा संघर्ष सुरू झाला आहे. तालिबान व हक्कानी नेटवर्कच्या नेत्यांत हा वाद सुरू आहे. तालिबानचा सहसंस्थापक अब्दुल गनी बरादर व हक्कानी गटाचे लोक यांच्यात काल गोळीबार होऊन संघर्ष झाला. यात अनस हक्कानी याने केलेल्या गोळीबारात मुल्ला बरादर हा जखमी झाला असून त्याच्यावर पाकिस्तानात उपचार सुरू आहेत. अफगाणिस्तान ताब्यात घेऊन आता तीन आठवडे उलटले असले तरी या अंतर्गत संघर्षामुळे तालिबानला अद्याप अफगाणिस्तानमध्ये आपले सरकार स्थापन करण्यात यश आलेले नाही.