>> निवडणुका पुढे ढकलण्याबाबत मागितला सल्ला
राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यासंबंधी सल्ला घेण्यासाठी त्यासंबंधीची फाईल पुन्हा एकदा राज्याचे ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.
ऍडव्होकेट जनरलकडे दुसर्यांदा पंचायत निवडणुकीसंबंधीची फाईल सल्ल्यासाठी पाठविण्यात आली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणाबाबत सल्ला घेण्यासाठी ऍडव्होकेट जनरलकडे फाईल पाठविण्यात आली होती.
दरम्यान, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी याबाबत भाष्य केले आहे. निवडणुका पावसाळ्यात घेऊ शकत नाही. तसेच निवडणुका पुढे ढकलल्या तर ट्रिपल टेस्टनुसार ओबीसी आरक्षणाचा अहवाल तयार करून घेतला जाऊ शकतो. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेणे योग्य होणार नाही. पंचायत निवडणूक ३ ते ४ महिने पुढे ढकलल्यास कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यकाळ संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे. ऍडव्होकेट जनरल यांच्या सल्लानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.