पंचायतीच्या निवडणुका ४ जूनला होण्याची शक्यता

0
16

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या ४ जून रोजी घेतल्या जाव्यात, अशी शिफारस राज्य निवडणूक आयोगाने केली असून, सत्ताधारी भाजप सरकारनेही त्याला सहमती दर्शविली आहे. त्यामुळे पंचायतींच्या निवडणुका ४ जून रोजी होण्याची शक्यता आहे. या पंचायतींची मुदत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपत असून, त्या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका ४ जूनला घेतल्या जाव्यात, असा प्रस्ताव राज्य सरकारला दिला आहे.

याबाबत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी देखील काल भाष्य केले. येत्या ४ जून रोजी राज्यात पंचायत निवडणुका होऊ घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंचायत क्षेत्रातील प्रभागांच्या फेररचनेचे कामही केले जात आहे. हे काम पूर्ण झाले की त्यानंतर प्रभागांच्या आरक्षणाचे कामही हाती घेतले जाणार आहे. मात्र, प्रभाग आरक्षणात आणखी वाढ केली जाणार नसल्याचे पंचायत मंत्र्यांनी स्पष्ट केले. अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय अशा सर्वांनाच यापूर्वीच आवश्यक तेवढे आरक्षण देण्यात आलेले आहे. आणि त्यात आणखी वाढ करण्याची गरज भासणार नसल्याचे गुदिन्हो म्हणाले.

पंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हांवर होणार नसल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

या पंचायतींवर चांगले लोक निवडून यावेत. ज्यांनी समाजकार्य केले आहे, लोकांसाठी मदतीचा हात दिलेला आहे असे चांगले लोक पंचायतींवर निवडले जावेत, असे आपणाला वाटत असल्याचे गुदिन्हो म्हणाले.

दरम्यान, प्रभाग फेररचनेचा मसुदा सरकारने पंचायतीतील लोकांना पाहण्यासाठी ठेवला होता. अनेकानी या फेररचनेला हरकती घेतल्या होत्या. या हरकती विचारात न घेतल्यास लोक न्यायालयात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी नगरपालिका निवडणुकांच्या वेळी प्रभाग फेररचनेचा मुद्दा गाजला होता व तो न्यायालयात गेला होता.

निवडणुकीची तारीख ४ जून अशी ठरवण्यात आलेली असली तरी अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यासंबंधीची अधिसूचना काढण्यात आल्यानंतरच निवडणुकीसाठीची तारीख निश्‍चित होईल व निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम ठरेल, असे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी नमूद केले. पुढील काळात पंचायतींना विकासकामांसाठी जास्त निधी देण्यात येणार आहे. तसेच जास्त अधिकार नसलेल्या जिल्हा पंचायतींना जास्त अधिकार देण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.