>> प्रभाग फेररचनेची प्रक्रिया रखडली; निवडणुका ८ ते १० दिवसांनी लांबणार
राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग फेररचनेची प्रक्रिया लांबल्याने पंचायत निवडणूक निर्धारित ४ जून रोजी होण्याची शक्यता कमीच आहे. पंचायत निवडणूक निर्धारित तारखेच्या आणखी ८ ते १० दिवस पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रभाग फेररचनेचे काम फेब्रुवारीपासून प्रारंभ केलेले आहे; मात्र ते काम अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही. पंचायत प्रभाग फेररचनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रभाग फेररचनेची अधिसूचना जारी झाल्यानंतर पंचायत प्रभाग राखीवता जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंचायत निवडणूक घेण्याची तयारी सुरू केली होती. त्यानंतर राज्य सरकारने ४ जून रोजी निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दाखविला होता. तथापि, प्रभाग फेररचना आणि प्रभाग राखीवतेच काम पूर्ण न झाल्याने निर्धारित तारखेला पंचायत निवडणूक होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पंचायत निवडणूक आणखीन ८ ते १० दिवस पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने पंचायत प्रभाग फेररचनेचा कच्चा मसुदा तयार करून नागरिकांच्या तक्रारी, आक्षेप, सूचनांसाठी खुला ठेवला होता. राज्यातील विविध पंचायत क्षेत्रातून सुमारे ९१३ जणांनी सूचना, आक्षेप, तक्रारी दाखल केल्या होत्या. उत्तर गोव्यातून ६५० आणि दक्षिण गोव्यातून २६३ सूचना व आक्षेप दाखल करण्यात आले होते. राज्य निवडणूक आयोगाने मार्च या महिन्यात पंचायत प्रभाग फेररचनेचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते; मात्र एप्रिल महिना उलटला तरी, प्रभाग फेररचनेबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.